*श्री रामेश्वर मंदिराच्या कलशारोहण वर्धापन दिन सोहळ्याचे औचित्य साधत करण्यात आले प्रकाशन
मालवण दि प्रतिनिधी कांदळगावचे सुपुत्र आणि गायक संगीतकार यांनी कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वरावर आधारित संगीतबद्ध केलेल्या ‘कांदळगावचा श्री रामेश्वर’ शिवभक्ती गीतांच्या संगीत अल्बमचे प्रकाशन रामेश्वर मंदिराच्या कलशारोहणच्या वर्धापन दिन सोहळ्याचे औचित्य साधून करण्यात आले. लॉकडाऊन काळात काही गाणी स्वतः लिहून संगीतबद्ध करून या अल्बमची निर्मिती केली असून यात सुरेश वाडकर, उत्तरा केळकर, स्वप्नील बांदोडकर या दिग्गज गायकांसह नवोदित गायकांनी गाणी गायली आहेत, अशी माहिती देत हा अल्बम संगीत रसिकांच्या पसंतीस उतरेल अशी आशा संगीतकार अभिजित राणे यांनी दिली. कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात आयोजित पत्रकार परिषदेत संगीतकार अभिजित राणे हे बोलत होते. यावेळी रामेश्वर मंदिर देवस्थानचे अध्यक्ष शिवराम परब, सचिव उदय राणे, विश्वस्त मधुसूदन परब, सुधाकर राणे, राजन कोदे, विनायक राणे, विनोद राणे, डॉ. जीवन पावसकर, सदानंद राणे, डॉ. सुप्रिया वाकणकर, उमेश कोदे, बाबी गुरव, शशी वझे आदी उपस्थित होते. यावेळी अभिजित राणे म्हणाले, लॉकडाऊनचा काळ हा सर्वच कलाकार मंडळींसाठी अतिशय खडतर गेला. मात्र याच काळात प्रतिकूल परिस्थिती आपल्या ग्रामदैवतेवर आधारित संगीत रचना करण्याची प्रेरणा मिळाली व आव्हाने पार सर्व कलाकारांनी जिद्दीने हा अल्बम पूर्ण केला आहे. हा आपला २२ वा अल्बम असून यात एकूण ११ गाणी आहेत. काही गाण्यांतून कांदळगावच्या रामेश्वरची महती व या मंदिरास छत्रपती शिवाजी महाराज यांचा लाभलेला इतिहास या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला आहे, असेही ते म्हणाले. या अल्बममध्ये सुरेश वाडकर, उत्तरा केळकर, स्वप्निल बांदोडकर, संगीता चितळे, माधुरी करमळकर, मकरंद देशपांडे, कीर्ती किल्लेदार, विद्या करलगीकर, प्रीती तळवलकर यांनी गीते गायली आहेत. तर गीतकार जयश्री अंबासकर, अमोल कशेळकर, शर्वरी करगुटकर, केदार परूळेकर, डॉ. सुप्रिया वाकणकर यांनी गीते लिहिली आहेत. संगीत संयोजन सिद्धार्थ करावडे यांनी केले आहे. तर काही गाणी आपण स्वतः लिहिली असून सर्व गाणी आपण संगीतबद्ध केली आहेत अशी माहिती यावेळी अभिजित राणे यांनी दिली. सूत्रसंचालन उमेश कोदे यांनी केले.
