मंत्री राणे, चव्हाण यांनी दिले नियुक्तीपत्र
मालवण दि प्रतिनिधी
आगामी कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लक्षात घेऊन भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी शिक्षक चळवळीतील कार्यकर्ते, सेवानिवृत्त शिक्षक सुरेश ज्ञानदेव चौकेकर यांची निवड करण्यात आली. भाजप जिल्हा कार्यकारिणी बैठकीत केंद्रीयमंत्री नारायण राणे व सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र चौकेकर यांना प्रदान करण्यात आले.
चौकेकर यांनी वराड येथील सौ. हि. भा. वरसकर विद्यामंदिर व वराड कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षक म्हणून ३५ वर्षे सेवा केली. माध्यमिक शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी गेली ३२ वर्षे संघटनेत कार्यरत व नेतृत्वही केले. कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये झालेल्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये चौकेकर यांची निवड जाहीर होताच त्यांचे अभिनंदन करण्यात आले. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रदेश चिटणीस नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेर्से, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत, सरचिटणीस प्रसन्ना देसाई व अशोक सावंत, प्रवक्ते संजू परब, ज्येष्ठ नेते राजू राऊळ व्यासपीठावर उपस्थित होते.
