कोविडच्या पार्श्वभूमीवर होणार नियम पाळून साजरा;३६५ खेड्यांचा अधिपति म्हणून देवस्थान आहे प्रसिध्द
*💫सावंतवाडी दि.०४-:* संस्थानाच्या भोसले घराण्याने ओटवणे गावातून चराठा गावाच्या वाडीला म्हणजेच आजच्या सावंतवाडीला दरबार हलविला. नंतर हे शहर गेल्या ३५० वर्षात अनेक नावाने ओळखले जाऊ लागले. ३६५ खेडेगावांचा मालक म्हणून श्री देव उपरलकर देवस्थानाला ओळखले जाते. त्यांच्यात शिवशंकराचा अंश असल्याची कथाही सांगितली जाते आणि त्यावर लोकांचा विश्वास आहे. या देवस्थानच्या श्रद्धेमुळे अनेक भाविकांचे रक्षण झाल्याच्या कथा आहेत. मोती तलावाकाठी राजधानी बसविण्याच्या वेळी चार सीमारक्षकांची नेमणूक राजघराण्याने केली. उपकरकर, माठेवाडयातील दिंडीकर, सालईवाड्यातील काजरेकर आणि गरडीतील हेळेकर हे चार सीमारक्षक उपरलकर शंकराच्या आद्यदेवतांचा अंश मानले जातात. श्री देव उपरलकर देवाकडे ३६५ खेड्यातील चाळे सुपूर्द आहेत. ३६५ खेड्यातून त्यावेळचे दांडेकर व प्रमुख गावकरी मंडळी बकरा अगर कोंबड्यांचा सांगड, एक नारळ व पानाचा विडा घेऊन वाजतगाजत येत. त्यावेळच्या राजांच्या हस्ते या देवकार्याचा सोहळा होत असे. संस्थानच्या ३६५ खेड्यांचा मालक म्हणून जबाबदारी उपरलकर देवाने घेतली, अशी आख्यायिका आहे. सावंतवाडी संस्थानाच्या स्थापनेनंतरच्या २५ वर्षांच्या काळातील हे उपरलकर देवस्थान आहे. ३६५ खेडेगावांचे रक्षण करणाऱ्या शंकराचा शिवगण म्हणून मानल्या जाणाऱ्या उपरलकरास कोंबे देण्याची प्रथा आहे. या देवस्थानशेजारी एक तळी आहे म्हणजेच विहीर आहे. या देवस्थानच्या जवळ उपरलकर स्मशानभूमी आहे. तेथे मृत व्यक्तीस अग्नी दिल्यानंतर क्रियाकर्म या तळीजवळ केले जायचे. सावंतवाडी शहरातील ३६५ खेड्यांचे दैवत या गावांचे मालक व रक्षणकर्ते श्री देव उपरलकर देवस्थानाला ओळखले जात आहे. श्री देव उपरलकर हे संस्थानच्या साडेतीनशे वर्षाच्या कालखंडात महाराजांचे श्रद्धास्थान होते. नवसाला पावणारा किंवा रक्षण करणारा देव म्हणून आजही श्री उपरलकर देवस्थानाची कीर्ती सर्वदूर पसरली आहे. त्यामुळे या मार्गाने जाणारे वाहनचालक वाहन थांबवून नतमस्तक होऊनच पुढे जातात. दर रविवारी आणि बुधवारी श्री देव उपरलकर देवस्थानाकडे शहरातील तसेच तालुक्यातील लोक आवर्जून उपस्थित राहत नतमस्तक होतात. त्याशिवाय इतर दिवशी देखील या देवस्थानाकडे वर्दळ सुरू असते. या देवस्थानात दर रविवारी व बुधवारी सावंतवाडी शहरासह आजूबाजूच्या गावातील भक्तगण, त्यात महिला, पुरुष, मुलेही येतात. आज उपरलकराची श्रद्धा एवढी मोठी आहे, की राजकारणी मंडळी निवडणूक काळात नतमस्तक होण्यासाठी येथे येतात. श्री देव उपरलकर देवस्थानाची आख्यायिका जेवढी मोठी आहे त्यापेक्षाही हाकेला किंवा नवसाला पावणारा देव किंवा प्रसंगाला अदृश्य स्थितीत सहकार्य करणारा देव म्हणून ओळख आहे. सावंतवाडी – आंबोली मार्गावर शहराच्या पाच मिनिटांच्या अंतरावर हे देवस्थान वसले असून सावंतवाडीवासियांची या देवस्थानाविषयी अपार श्रद्धा आहे. तसेच या उपरलकर देवस्थानाकडे बुधवारी व रविवारी नवस बोलले जातात. नवस करण्यासाठी कोंबड्यांना देऊन नवसफेड करतात. शहरातून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे देवस्थान खरोखरच निसर्गमय ठिकाणी वसले आहे. या उत्सवदिनी शहर व शहरालगतच्या गावातील भाविक मोठ्या संख्येने येतात व श्री देव उपरलकर देवस्थानाचा प्रसाद स्वीकारतात. आज श्री देव उपरलकर देवस्थानचा होणारा वार्षिक उत्सव हा कोव्हिड मुळे अगदी साध्या पद्धतीत व कोव्हिड नियमांचे पालन करून साजरा होणार आहे. तरी या उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत
