कुडाळ येथील मोर्चात केंद्रीयमंत्री राणे यांच्या विरोधात केले होते प्रक्षोभक भाषण
⚡ओरोस ता.०१-: उध्दव ठाकरे शिवसेना गटाचे नेते आ भास्कर जाधव यांना येथील जिल्हा न्यायालयाने २३ नोव्हेंबर पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
आ वैभव नाईक यांना लाचलुचपत विभागाच्यावतीने चौकशीची नोटीस पाठविण्यात आल्याने त्यांच्या समर्थनार्थ १८ ऑक्टोबर रोजी कुडाळ येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी उपस्थित असलेल्या भास्कर जाधव यांनी प्रक्षोभक भाषण केले होते. विशेषतः केंद्रीयमंत्री नारायण राणे व त्यांच्या कुटबियांवर आरोप केले होते. त्यामुळे भाजप कार्यकर्ते संतप्त झाले होते. परिणामी भाजपचे कुडाळ अध्यक्ष दादा साईल यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
जनसमूदायास संबोधित करताना भारतीय जनता पार्टीचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेला बाधा होईल व त्यांची जनमानसातील प्रतिमा मलिन होईल अशा रितिने अर्वाच्य भाषेत तसेच भारतीय जनता पार्टी व महाविकास आघाडीचे घटक पक्ष यांचे कार्यकर्ते यांच्या मध्ये तेढ व संघर्ष निर्माण होईल, असे भाषण केल्याने भा.द.वी कलम १५३, ५०५(१)(क), ५००, ५०४ अन्वये कुडाळ पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आपल्याला अटक होवू नये यासाठी जिल्हा न्यायालयात आ जाधव यांनी अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सुनावणी होत न्यायालयाने त्यांना २३ नोव्हेंबर पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
