सर्वधर्म समभावाने राहण्याची प्रेरणा रुजणे काळाची गरज : मंगल परब

⚡कणकवली ता.०१-: खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षाकडून राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला.

सरदार पटेल यांनी स्वातंत्र्य चळवळीत आणि त्यानंतर देशाची राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी दिलेल्या योगदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशातून सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय एकता दिवस’ ३१ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

‘राष्ट्रीय एकता दिवस’ ही एक लोकप्रिय चळवळ व्हावी, या उद्देशाने ‘एकतेसाठी दौड’ (रन फॉर युनिटी), व्याख्यान व एकता प्रतिज्ञा पठन असे विविध उपक्रम राबविले गेले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पाअर्पण करुन अभिवादन करण्यात आले, तसेच माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधीच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
देशाचा विकास, सुख समृध्दी या एकतेमुळे सामाजिक सलोख्यामुळे कायम राहाते. वर्षानुवर्ष गुलामगिरीत असलेल्या भारताला वीर स्वातंत्र्य सैनिकांनी एकतेच्या बळावरच स्वातंत्र्य मिळवुन दिले. या राष्ट्रीय एकतेला पाहुनच ब्रिटीशांना भारत सोडुन पळुन जावे लागले. एकतेचे महत्व आपण जाणले पाहिजे आणि आजच्या तरूण पिढीत एकत्र आणि सर्वधर्म समभावाने राहाण्याची प्रेरणा रूजवायला हवी, असे मत प्रमुख वक्त्या श्रीमती मंगल परब यांनी केले.

भारताच्या एकात्मतेत सरदार पटेलांचे अतुलनीय योगदान आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रारंभी देशातील सुमारे ५०० हून अधिक संस्थानात राजे-महाराजांचा स्वतंत्र कारभार चालत होता. परंतु सरदार पटेल यांनी या संस्थानांचे भारतात यशस्वी विलिनीकरण घडवून आणले. त्यामुळे देशाचे अनेक तुकड्यात विभाजन होण्याचे टाळण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा सिंहाचा वाटा आहे, असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात संस्था संचालक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आत्माराम कांबळे यांनी केले.

या प्रसंगी प्राचार्य डॉ.आत्माराम कांबळे, महाविद्यालयीन कर्मचारी समन्वयक वसीम सय्यद, वाणिज्य विभाग प्रमुख सहा. प्रा. महमंदअली मुन्शी व प्राध्यापकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष विद्यार्थी प्रतिनिधि भक्ती पिसे व गुरुनाथ भोसले, अदिती भालेकर, जयश्री इंगले, मयुरी पवार, मयूर मोरे, नवेद मुकादम, सुजय पेडणेकर आदी राष्ट्रीय सेवा योजना कक्ष स्वयंसेवकांनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख वसीम सय्यद यांनी केले तर आभारप्रदर्शन मयूर मोरे यांनी केले. छायाचित्रकार म्हणून नवेद मुकादम यांनी बजावली.

You cannot copy content of this page