निकेत पावसकर यांच्या अक्षरघर संकल्पनेचे केले कौतुक
⚡कणकवली ता.२१-: “अक्षरघरात” आगमन झाल्यानंतर पहिली मिळालेली प्रतिक्रीया “वाह खूपच सुंदर…”ही आपसुक मिळालेली प्रतिक्रीया उपविभागीय अधिकारी तथा कणकवली प्रांताधिकारी सौ.वैशाली राजमाने यांनी व्यक्त केली.
कणकवली प्रांताधिकारी सौ.वैशाली राजमाने यांनी कोणतेही निमंत्रण न देता अक्षरघराला सदिच्छा भेट देण्याची त्यांना इच्छा झाली.आणि खुद्द प्रांताधिकारी सौ.वैशाली राजमाने यांनी वैभववाडीचा दौरा आटपून येत असतांना आपला मोर्चा सरळ निकेत पावसकर यांच्या अक्षरघराकडे अचानक वळविला.
एखादी उच्च पदस्थ व्यक्ती आपल्या आगळ्यावेगळया पत्र संग्रहाला अचानक भेट द्यायला येत असल्याचे ऐकून निकेत पावसकरही आनंदीत झाला. सुमारे दिड ते दोन तास केवळ “अक्षरोत्सव”संग्रहातील विविध मान्यवरांची संदेश पत्रे मनसोक्तपणे पाहिली. संवादात्मक चर्चात्मक मैफिलही चांगली रंगली होती.
या संदेश पत्रांच्या अनुषंगाने अनेक आठवणी, अनेक भावस्पर्शी आणि सामाजिक संदेश, अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर व्यक्ती यांनी सजलेल्या या पत्रसंग्रह संपूर्णपणे न्याहाळून चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि समाधान व्यक्त केले.
आणि जाता जाता या भेटीच्या निमित्ताने लिहिले…प्रिय निकेत,
सध्याच्या मोबाईल,इंटरनेटच्या जगात सुमारे 1700 हून अधिक मान्यवर व्यक्तींच्या पत्रांचा संग्रह तु केला आहेस. ही निश्चितच अदभुत गोष्ट आहे. प्राप्तकाल हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोदा
निजनामें तयावरी गोंदा
या कविवर्य विं. दा. करंदीकर यांच्या स्फूर्तीदायक काव्याप्रमाणे तुझे हे ‘अक्षरलेणे’ कालातीत आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढून शुभेच्छा देत निरोप घेतला.
यावेळी तळेरे मंडळ अधिकारी संतोष नागावकर, कवी, लेखक आणि अभिनेते प्रमोद कोयंडे, तंबाखू प्रतिबंध अभियानच्या सौ.श्रावणी मदभावे आणि सतिश मदभावे, चित्रकार अक्षय मेस्त्री,पत्रकार संजय खानविलकर,दारुम उपसरपंच भरत चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव, तळेरे कोतवाल रमेश तांबे, चालक श्री.जोगळे आणि सौ.सुनयना पावसकर आदी उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी सौ. वैशाली राजमाने यांना प्रमोद कोयंडे यांनी आपले “सोबतीन” हे पुस्तक तर प्रज्ञांगण परिवाराकडून दिपावलीच्या “पणत्या” भेट देण्यात आल्या.
