हुमरस, बापार्डे, परुळे बाजार ग्रामपंचायतचा समावेश
ओरोस ता.१४-:
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०१८-१९ आणि २०१९-२० या दोन्ही वर्षात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील हुमरस, बापार्डे आणि परुळे बाजार या ग्रामपंचायतींचे मूल्यमापन करण्यासाठी राज्यस्तरीय समिती १५ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात दाखल होत आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे चंद्रकांत मोरे यांच्यासह तीन सदस्य समितीचा यात समावेश आहे.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०१८-१९ मध्ये कुडाळ तालुक्यातील हुमरस ग्रामपंचायतीने कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यामुळे ही ग्राम पंचायत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली होती. तर २०१९-२० या वर्षातील स्पर्धेत देवगड तालुक्यातील बापार्डे ग्रामपंचायतीने कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच वेंगुर्ले तालुक्यातील परुळे बाजार ग्रामपंचायतीने कोकण विभागात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायती राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत. मात्र, या दोन्ही वर्षाचे राज्यस्तरीय मूल्यमापन करण्यात आले नव्हते.
यासाठी शासनाने राज्यस्तरीय समिती गठीत केली आहे. या समितीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मूल्यमापन दौरा जाहीर केला आहे. या समितीत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अवर सचिव समिती अध्यक्ष यांचे प्रतिनिधी चंद्रकांत मोरे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे कक्ष अधिकारी तथा समिती सदस्य प्रतिनिधी बाळासाहेब हजारे, याच विभागाचे सहाय्यक कक्ष अधिकारी तथा सदस्य प्रतिनिधी रमेश पात्रे यांचा समावेश आहे. ही समिती १५ ऑक्टोबर रोजी हुमरस ग्रामपंचायतला भेट देवून केलेल्या कामांचे मूल्यमापन करणार आहे. १६ रोजी बापार्डे ग्रामपंचायतीला भेट देणार आहे. १७ रोजी परुळेबाजार ग्रामपंचायतीला भेट देणार आहे. यावेळी ही समिती अभियान कालावधीत केलेल्या कामांचे मूल्यमापन करणार आहे. तसेच कागदपत्रांची पडताळणी करणार आहे.
