राज्याचे भूजल सर्वेक्षण संचालक मल्लिनाथ कलशेट्टी यांचे प्रतिपादन
*💫सिंधूदुर्गनगरी दि.०१-:* सिंधूदुर्ग जिल्ह्यातील नागरिक शासनाच्या प्रत्येक योजनेत चांगले काम करतात. स्वच्छ्तेत या जिल्ह्याने चांगले काम केल्याने आपण या जिल्ह्याच्या प्रेमात पडलो. हागंणदारी मुक्त अभियानात सिंधूदुर्ग जिल्ह्याने एवढे मोठे काम केले की राष्ट्रपतींच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार दिल्ली येथे स्विकारण्यासाठी जाण्याकरिता रेल्वेचा डबा आम्हाला बुक करावा लागला होता. कर वसूलीत तर या जिल्ह्याचा हात कोणीच धरु शकत नाही. स्वच्छ पाणी बाबत जिल्ह्यातील नागरिक जागृत आहेत, अशी प्रतिक्रिया राज्याचे भूजल सर्व्हेक्षण संचालक तथा महाराष्ट्र राज्यात लोकप्रिय ठरलेल्या ग्राम स्वच्छ्ता अभियानाची चळवळ निर्माण करणाऱ्या डॉ मल्लीनाथ कलशेट्टी यानी सोमवारी जिल्हा परिषदेत बोलताना केले. डॉ कलशेट्टी हे जिल्हा दौऱ्यावर आले असता जिल्हा परिषदेने त्यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना डॉ कलशेट्टी यानी, सांगली जिल्हा परिषदेत ग्राम पंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी असताना आमची जिल्हास्तरिय समिती सिंधूदुर्ग जिल्ह्याच्या मूल्यमापनसाठी आली होती. यावेळी आंबडोस गाव प्रथम आला होता. यावेळी आपण पूर्ण सिंधूदुर्ग जिल्हा फिरलो होतो. त्यानंतर शासनाने आपली हागंणदारी मुक्त अभियानच्या राज्य समन्वयक पदी नियुक्ती केली. यावेळी आपण सिंधूदुर्ग जिल्ह्याचे काम जवळून पाहिले आहे. यानंतर शासनाने पर्यावरण संतुलित ग्राम समृद्ध योजना आणली. यातही सिंधूदुर्ग पुढे होता. कर वसूली, शौचालय उभारणी ही कामे मोठ्या स्वरुपात केल्याने जिल्ह्याला हे यश मिळाले. यामुळे हा जिल्हा माझे नेहमीच आकर्षण राहिले आहे. वेंगुर्ले नगर परिषदेने सांडपाणी व्यवस्थापन व कचरा निर्मूलन यामध्ये केलेले काम राज्यातील मोठ्या नगरपालिकानी करावे, असे आपल्याला वाटते. राज्याच्या तुलनेत सिंधूदुर्ग जिल्ह्याची नैसर्गिक व भौगोलिक स्थिती वेगळी आहे. त्यामुळे या जिल्ह्यात यासाठी वेगळे नियोजन अपेक्षित आहे. स्वच्छतेत जिल्ह्यातील नागरिक जागृत आहेत. ९० टक्के नागरिक पाणी नमूने तपासणी करून घेतात. आता सिंधूदुर्ग जिल्हा जलजीवन मिशनचे काम चांगले करेल, अशी अपेक्षा आहे, असे शेवटी डॉ कलशेट्टी यानी सांगितले.
