⚡सिंधुदुर्गनगरी ता.०८-: सिंधुदुर्गनगरी निर्मितीला पंचवीस वर्षे उलटली तरी जिल्हा मुख्यालयाचा विकास होऊ शकलेला नाही. केवळ विकासाची स्वप्ने दाखवली गेली. झालेले विकास प्रकल्प वापरावीना ओस पडलेत. त्यामुळे नियोजनबद्ध विकासासाठी सिंधुदुर्गनगरी विकास नियोजन व विचार विनिमय करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात यावे. अशी मागणी सिंधुदुर्गनगरी येथील सामाजिक कार्यकर्ते सुशील निब्रे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिंधुदुर्ग नगरीमध्ये अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालय, बँका, पत्रकार भवन, महाविद्यालये, शाळा, खाजगी कार्यालय, निवास योजना आणि वाणिज्य वापरासाठी जागा दिलेल्या आहेत. मात्र या जागांचे झालेले वितरण नियोजनबद्ध झालेले नाही .त्यामुळे सिंधुदुर्गनगरीचा नियोजनबद्ध असा आराखडा बनविण्यात यावा. सद्यस्थितीत प्राधिकरण क्षेत्रात शिल्लक असलेले भूखंड, आरक्षित भूखंड यांचे योग्य नियोजन करण्यात यावे.अशी मागणी या निवेदनातून निब्रे यांनी केली आहे.
सिंधुदुर्गनगरी हे सिंधुदुर्ग जिल्हा केंद्र असल्याने येथे सर्वच महत्वाची शासकीय / निमशासकीय कार्यालये येथे आहेत.
सिंधुदुर्गनगरी चा यापुढील वाटचालीचा विचार करता अनेक गोष्टींचा विचार होणे गरजेचे आहे.व त्यासाठी काही निवडक मंडळी निवडून ओरोस – सिंधुदुर्गनगरीचा आराखडा करणे गरजेचे आहे. त्यामध्ये
सध्यस्थितीत प्राधिकरण क्षेत्रात शिल्लक भूखंड आरक्षित भूखंड यांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
जेणेकरुन सिंधुदुर्गनगरीच्या पुढील वाटचालीत विकासाचे सुयोग्य नियोजन होऊन अपेक्षीत विकसीत
सिंधुदुर्गनगरी उभारता येईल.
- विकासासाठी महत्वाची धोरणे
- सिंधुदुर्गनगरीचे प्रवेशव्दार सुशोभिकरण.
- शासकीय मेडीकल कॉलेजचा बाजूला असलेल्या भूखंडाचे नियोजन.
- भविष्यात होणारी नगरपंचायत व त्याची इमारत इत्यादी.
*ओरोस व्यापारी संकुल, आठवडा बाजार यांचे नियोजन. - विरंगुळा केंद्र, नाटयगृह, पार्कींग व्यवस्था, गार्डन, व्यायामशाळा, म्युझीयम इत्यादी. * सार्वजनिक प्रसाधनगृह, सांडपाणी व्यवस्था, कचरा डेपो इत्यादी.
- पाणी, विज, रस्ते याबाबत नियोजन.
- अग्निशमन व्यवस्था.
तरी आपण सदरील बैठकीचे नियोजन करुन सिंधुदुर्गनगरीमधील निवडक मंडळींना निमंत्रीत करावे व सिंधुदुर्गनगरीच्या विकासाला गती मिळवून दयावी . अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेत सुशिल निब्रे यांनी निवेदनद्वारे केली आहे.
