जिद्द, चिकाटीच्या जोरावर खेळात यश संपादन करा

ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचे आवाहन;
आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ

सिंधुदुर्गनगरी ता ०७
देश सेवा करण्यासाठी सैन्यात भरती व्हा आणि ऑलिंपिक मध्ये संधी मिळवा. तसेच या स्पर्धेत खिलाडू वृत्तीने खेळून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर विजय संपादन करा. असे प्रतिपादन माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी केले.

बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कोकण विभागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कबड्डी व बास्केटबॉल स्पर्धांचे आयोजन ७ व ८ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस- ओरोस यांच्यावतीने सिंधुदुर्गनगरी येथे या स्पर्धा होत असून या स्पर्धेत कोकण विभागातील २५ महाविद्यालयातील ७७५ विद्यार्थी- विद्यार्थिनी सहभागी झाल्या आहेत.

सिंधुदुर्गनगरी येथील बॅडमिंटन हॉल येथे माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच हार्टिकल कॉलेज ऑफ सरलगाव आणि फिशरीज कॉलेज ऑफ रत्नागिरी यांच्यातील कबड्डीच्या सामन्याने या स्पर्धेचा शुभारंभ झाला. यावेळी व्यासपीठावर कृषी महाविद्यालय किर्लोस्कचे प्राचार्य योगेश पेडणेकर, दापोली कृषी विद्यापीठाचे क्रीडा उपक्रम संचालक व्ही जी नाईक, रत्नागिरी मत्स्य महाविद्यालयाचे मत्स्य जलशास्त्र विभाग प्रमुख डॉ अनिल पानसे, दापोली कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ ए एस सावंत, दापोली विद्यापीठ क्रीडा अधिकारी एम एस पाटील, डॉ एम आर शिंदे, डॉ सागर मोरे, डॉ राजेश धोपावकर, ओरोस सरपंच मनस्वी परब, यांच्यासह कबड्डी आणि बास्केटबॉल जिल्हा फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रसाद ओगले यांनी केले. तर व्ही जी नाईक यांनी सर्व महाविद्यालयांनी खेळाच्या सुविधा उपलब्ध करा असे आवाहन केले. तसेच शिक्षणाबरोबरच शारीरिक क्षमता व नैपुण्य दाखविणारा हा उपक्रम असून यातून ऑलम्पिक मध्ये संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. सिंधुदुर्ग नगरी येथे ७ व ८ ऑक्टोबर या दरम्यान कबड्डीचे ३८ तर बास्केटबॉल चे २१ असे एकूण ५९ संघ खेळणार आहेत. तर या स्पर्धेचे प्रनित वालावलकर, अजय शिंदे यांच्यासह त्यांचे सहकारी पंच म्हणून काम पाहणार आहेत.

You cannot copy content of this page