नशाबंदी मंडळ आणि सामाजिक बांधिलकीचे आयोजन
⚡सावंतवाडी ता.०६-: महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त नशाबंदी मंडळ शाखा सिंधुदुर्ग आणि सामाजिक बांधिलकी सावंतवाडी यांच्यावतीने सावंतवाडी शहरातून व्यसनमुक्तीच्या सप्ताहा निमित्त व्यसनमुक्ती बाबत जनजागृती करण्यासाठी भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
गांधी जयंती लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करतांना त्याचे विचार कृतीत आणणे आवश्यक आहे. गांधीजींच्या मते देशाला स्वराज्य मिळविण्यात ज्या गोष्टीचा अडथळा होता त्यात सर्वात जास्त अडथळा व्यसनाधीनतेचा!आजही तीच परिस्थिती दृष्टीस पडते. व्यसनामुळे व्यक्ती गुलाम होतो मग परिवार आणि समाज अशा पध्दतीने व्यसनांच्या गुलामगिरीत देश अडकत आहे.
समाजातील युवावर्गात वाढणारी व्यसनाधीनता, त्याचा परिणाम संपूर्ण समाजात होत आहे. सगळीकडे नशेत बेधुंद तरूणाचे चित्र पाहायला मिळते आहे. जागोजागी गुटख्याच्या पाकिटांचा ढिग पडलेला , कित्येक ठिकाणी दारुच्या रिकाम्या बाॅटल चे दृश्य दिसते. यासाठी व्यसनांच्या दुष्परिणामाची समाजात जागृती निर्माण करण्याच्यादृष्टीने अशा प्रकारच्या जनजागृती फेरी चे आयोजन करणे गरजेचे असते.
असे विचार रॅलीच्यावेळी नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता राजेंद्र मुंबरकर यांनी व्यक्त केले सहभागी विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीच्या घोषणांनी सावंतवाडी बाजारपेठ दुमदुमून टाकली रॅलीमध्ये जवळपास 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या रॅलीत आर पी डी हायस्कूल, वि. स. खांडेकर जिल्हा परिषद शाळा नं 4 एम एस डब्लू काॅलेज उर्दू शाळा. या शाळा महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घेतला होता. जिल्हा रुग्णालय तंबाखू नियंत्रण विभागाचे समुपदेशक श्री अल्मेडा, सावंतवाडी रुग्णालयाच्या उपदेशक कशाळेकर यांनीही रॅलीत सहभाग घेतला या रॅलीसाठी सामाजिक बांधिलकीच्या रवी जाधव व संजय पेडणेकर आणि त्यांच्या टीमचे विशेष सहकार्य मिळाले तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. विनया बाड मॅडम यांनी मुलांच्या अल्पोपहार ची व्यवस्था करून विशेष सहकार्य केले शेवटी व्यसन मुक्तीची शपथ देवून रॅलीची सांगता करण्यात आली यार रॅलीसाठी ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव, रो. दिलीप म्हापसेकर व शाळेचे शिक्षक उपस्थित होते.
