भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचा प्रश्न;दुसरीकडे साहित्य वळवून आणखी एक उद्घाटन करायचे होते का ? असाही केला प्रश्न
मालवण दि प्रतिनिधी
मालवण नगरपालिकेच्या व्यायाम शाळेतील साहित्य निकृष्ट दर्जाचे होते हे आमदार वैभव नाईक यांना माहीत होते तर त्यांनी त्या निकृष्ट दर्जाच्या साहित्याच्या व्यायाम शाळेचे उदघाटन का केले की, आमदार वैभव नाईक यांना तेच साहित्य दुसऱ्या ठिकाणी दाखवून अजून २५ लाख रुपये उकळायचे होते का ? असे सवाल उपस्थित करीत भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष श्री. धोंडू चिंदरकर यांनी ज्या अर्थी ते साहित्य उद्घाटनानंतर त्या ठिकाणाहून हलविले गेल्याने दुसऱ्या ठिकाणी अजून एक उदघाटन दाखवायचे होते असा त्याचा अर्थ असल्याचा संशय त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.
सध्या मालवण नगरपालिकेच्या व्यायाम शाळेतील निकृष्ट साहित्याचा मुद्दा हा शिवसेना भाजप पक्षात वादाला कारणीभूत ठरले आहे. या मुद्द्यावरून शिवसेना भाजप या दोन्ही पक्षामध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्यावर केलेल्या टीकेचा आज भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून समाचार घेतला. गेल्या अडीज वर्षात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला सत्ता कशासाठी असते आणि ती कशी राबवायची असते हे माहीत नाही त्यांनी प्रशासकीय गोष्टी प्रशासकीय गोष्टी शिकवू नयेत. देवबाग तळाशील बंधाऱ्याबाबत क्रॉसेक्शन सर्व्हे झाले नसल्याबाबत आवाज उठविल्या बद्दल राज्य शासनाकडून या सर्व्हेचे पैसे भरले गेले नव्हते आपल्याला प्रशासनाचे ज्ञान आहे असे सांगणाऱ्यानी भाजपने क्रॉसेक्शन सर्व्हेबाबत आवाज उठविल्यानंतर ते पैसे भरले. तो सर्व्हे करण्यासाठी शिवसेनेने का पाठपुरावा केला नव्हता, याचे उत्तर द्यावे, त्यामुळे प्रशासकीय बाबत शिवसेनेने बोलणे म्हणजे एक विनोद आहे, असे नमूद करून श्री.चिंदरकर यांनी म्हटले आहे की देवबाग बंधाऱ्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक कोटीचा निधी दिला. निधी मंजूर झाल्यानंतर त्या भागातील मते भाजपकडे वळतील या धास्तीने सत्तेचा गैरवापर करून देवबाग बंधाऱ्याबाबत कोणी कोलदांडा घातला, याचे उत्तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी द्यावे, आज देवबाग तारकर्ली रस्त्याची जी दैनावस्था झाली आहे. त्याला जबाबदार कोण ? महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात झालेल्या रस्त्यांची दुरावस्था झाली, देवबाग जिओ ट्यूबचा बंधारा वाहून गेला, ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार करता येईल, त्या त्या ठिकाणी शिवसेनेने भ्रष्टाचार केल्याचा आरोप श्री. चिंदरकर यांनी करतानाच आमदार वैभव नाईक हे सध्या कोणा बरोबर बैठका घेत आहेत, याची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती घ्यावी, नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल असा टोलाही चिंदरकर यांनी खोबरेकर यांना लगावला आहे.
