वैद्य विठ्ठल गुराम यांची मागणी…
मालवण दि प्रतिनिधी
राज्य शासन दशावतारी, तब्बलजी, भजनी बुवा, गवंडी यांना पेन्शन देते मात्र विविध आजारातील व्यक्तींना तसेच मुक्या जनावरांनाही रोगमुक्त करण्याचे काम खेड्यापाड्यातील वैद्य मंडळी करीत असून अशा प्रकारची जनसेवा करणाऱ्या साठ वर्षे असलेल्या वैदूंना शासनाने मानधन सुरू करावे, अशी मागणी गुरामवाडचे वैदू विठ्ठल गुराम यांनी केली आहे.
जिज्ञासा धन्वंतरी वनौषधी संस्था मालवण- सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष प्रताप पवार, सचिव संदीप तळगावकर तसेच संस्थेचे सुमारे २५० च्या दरम्यान वनौषधी सदस्य या विविध रोगांवर वनौषधी देऊन मुक्या जनावरांना तसेच विविध आजारातील माणसांना रोगमुक्त करण्याचे काम ही संघटना करीत असून कुठल्याही प्रसिद्धीच्या झोतात न येता प्रामाणिकपणे जनसेवा करीत वनौषधी लावा जीवन जगवा असा संदेश देणारे जिज्ञासा धन्वंतरी वनौषधी संस्थेचे विठ्ठल रामचंद्र गुराम यांनी आतापर्यंत सुमारे २०० च्या वर जनावरांना वनौषधीने बरे केले. त्यांनी आतापर्यंत जनावरांची मोडतोड, आजार, अंग सारणे सरपटणाऱ्या प्राण्यांचा जनावरांना दंश आदींवर आयुर्वेदिक वनौषधीने चांगले केल्याने अनेक जनावरांना गुण आला व ती बरी झाली. तसेच मनुष्याला धावरे, कावीळ, मुतखडा, धुपणी इतर मनुष्याच्या आजारावर वनौषधी देऊन अनेक पिढीतांना आजारमुक्त करतात त्यामुळे शासनाने अशा या वैदूंचा पेन्शन योजनेसाठी विचार करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
