ग्रंथ व्यवहारातूनच भाषा जीवंत राहून समृद्ध बनते : वीरधवल परब

वेंगुर्ला येथे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

*💫वेंगुर्ला दि.२९-:* भाषेतील ग्रंथ व्यवहारातूनच कोणतीही भाषा जीवंत रहाते आणि समृद्ध होते. त्यातील माहितीचे संप्रेक्षण व्हावे या हेतूने लेखन करणारे त्या विषयातील अभ्यासक, संशोधक, लेखक, कवी यांचेकडून ग्रंथनिर्मिती केली जाते. नगरवाचनालय वेंगुर्ला ही संस्था वाचनाभिमूख वातावरणातून कार्य करीत आहे. साहित्यिक, व्यासंगी वाचक पुरस्कार, विविध स्पर्धांचे आयोजन करुन प्रत्यक्ष वाचन चळवळ बळकट करीत आहे, असे प्रतिपादन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त वीरधवल परब यांनी ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले. महाराष्ट्र शासनातर्फे साजरा करण्यात येणाऱ्या ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडाचे औचित्य साधून वेंगुर्ला येथील नगरवाचनालयात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उदघाटन वीरधवल परब यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे उपकार्यवाह नंदन वेंगुर्लेकर, कार्यकारी मंडळ सदस्य प्रा. महेश बोवलेकर, दीपराज बिजितकर, रमेश पिगुळकर, सत्यवान पेडणेकर, एस. एस. काळे, नाना कांबळी, जगदीश तिरपुडे, प्रकाश वेंगुर्लेकर, गुरुनाथ बांदवलकर, संभाजी येरागी यांच्यासह वाचक सभासद उपस्थित होते. या ग्रंथ प्रदर्शनात कथा, कादंबऱ्या, चरित्र, ऐतिहासिक, ज्योतिष, आरोग्य, नाटक, शिक्षण, प्रवास, धार्मिक तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांसाठी उपयुक्त ग्रंथ मांडण्यात आले होते. प्रास्ताविकात कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना संस्थेत असणाऱ्या विविध विषयांवरील पुस्तकांची माहिती व्हावी यासाठी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन केले असल्याचे सांगितले. आभार संस्थेचे कार्यवाह कैवल्य पवार यांनी मानले.

You cannot copy content of this page