आशिष हडकर यांची आय. आर. बी. कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे मागणी
*💫मालवण दि.२९-:* सिंधुदुर्गच्या विकास प्रक्रियेत महत्वाचे स्थान प्राप्त करणाऱ्या चिपी येथील विमानतळावर होणाऱ्या नोकर भरती प्रक्रियेत जिल्ह्यातील स्थानिक युवक-युवतींना प्रथम प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशिष हडकर यांनी आय. आर. बी. कंपनीच्या मुंबईस्थित मुख्यालयामध्ये मुख्य अधिकारी श्री. देशमुख यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत केली. भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशिष हडकर आणि आय. आर. बी. कंपनीचे अधिकारी यांची चिपी येथे तसेच मुबई येथे बैठक झाली या बैठकीत विमानतळ कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच विमानतळ भरती प्रकियेत स्थानिकांनाच प्राधान्य देण्यात यावे. या लेखी निवेदनावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्य अधिकाऱ्यांनी स्थानिक युवक युवतींना भरती प्रकियेला अनुकूलता दर्शविली. विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या काही महिन्यातच ते लोकांच्या सेवेत येणार आहे. तरी या विमानतळ भरती प्रकियेत स्थानिकांना सामावून घेण्यासाठी प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकारी वर्गासोबत पाठपुरावा सुरूच राहणार असून जिल्ह्याबाहेरील व्यक्तींना याठिकाणी प्रखर विरोध केला जाणार असल्याचे आशिष हडकर यांनी म्हटले आहे.
