मुसळधार पावसामुळे बळीराजास ‘थोडी खुशी थोडा गम’

नाचणी, भुईमूग पिकांना उपयुक्त पाऊस

⚡बांदा ता.११-: गेल्या तीन चार दिवसांपासून बांदा दशक्रोशीत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला. पाणथळी जमिनीत असलेले पीक धोक्यात आले तर भरडी जमिनीवर असलेले पीक बहरले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बळीराजावर ‘थोडी खुशी थोडा गम’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
गणेशोत्सवाच्या पहिल्या पाच दिवसांत पावसाने विश्रांती घेतली. मडुरा पंचक्रोशीसह बांदा दशक्रोशीत गेले दोन दिवस पावसाचे प्रमाण अधिक वाढले आहे. पाणथळ जमिनीवरील भातपिकाला लोम आले आहे. त्यामुळे याठिकाणी भातात पळीज होण्याचा होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर भरडी जमिनीवरील पीक सद्यस्थितीत सुरू असलेल्या पावसामुळे चांगले बहरले. एका बाजूने फायदा तर दुसऱ्या बाजूने तोटा अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर आली आहे.
सद्यस्थितीत सुरू असलेल्या पावसाचा नाचणी, भुईमूग पिकाला मोठा फायदा होईल. दोन्ही पिकांना उपयुक्त असा पाऊस सुरू आहे. अजून चार पाच दिवस जर असाच पाऊस सुरू राहिल्यास पाणथळ जमिनीवरील पिकांचे मोठे नुकसान होण्याची भिती शेतकऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. रविवारी संध्याकाळी उशीरापर्यंत पावसामुळे काेणतेही हानी झाल्याची घटना घडली नाही.

You cannot copy content of this page