मुसळधार पावसाने होडावडा पूलावर पाणी तर भाविकांचा हिरमोड

⚡वेंगुर्ला ता.११-: शनिवारी सायंकाळीपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे होडावडा पुलावरुन पाणी वहात होते. त्यामुळे काहीकाळ सावंतवाडी-तळवडे-वेंगुर्ला या मार्गाने होणारी वाहतूक ठप्प झाली. तर अकराव्या दिवशीच्या गणपती विसर्जनाला भक्तांचा हिरमोड झाला.

  गेले काही दिवस दडी मारुन बसलेल्या पावसाच्या अधूनमधून तुरळक सरी कोसळत होत्या. दरम्यान, शनिवारी सायंकाळपासून मुसळधार कोसळायला सुरुवात झाल्याने छोट्या मोठ्या नद्यांमधील पाण्याची पातळी वाढली होती. शनिवारी अकरा दिवसाच्या गणपतीचेही विसर्जन होते. मात्र, पाऊस थांबायचे चिन्हे न दिसल्याने भाविकांनी पावसातच आपापले गणपती विसर्जन केले. या पावसामुळे भाविकांच्या उत्साहावर विरजण पडले. तरीही फटाक्यांच्या आतषबाजीत विसर्जन सुरु होते.

  या मुसळधार पावसाने होडावडा पुलावरुन पाणी जाण्याव्यतिरिक्त अन्य तालुक्यात कुठेही पडझड झाली नसल्याचे आपत्ती विभागाकडून सांगण्यात आले. वेंगुर्ला तालुक्यात गेल्या २४ तासात ११९ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.
You cannot copy content of this page