दक्षिण गोव्याची जबाबदारी नारायण राणेंकडे

मतदारसंघाचा घेतला आढावा : लोकसभा मतदारसंघ जिंकणारच असल्याचा व्यक्त केला विश्वास

पणजी: केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे भाजपने दक्षिण गोव्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यांनी आज या मतदारसंघाचा आढावा घेत हा लोकसभा मतदारसंघ जिंकणारच असा विश्वास व्यक्त केला. पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री राणे बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर उपस्थित होते.

भाजपने 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून देशातील 70 केंद्रीय मंत्र्यांना प्रत्येकी दोन या पद्धतीने देशातील 140 मतदारसंघांची जबाबदारी देऊन त्या त्या मतदारसंघात पाठविण्यात आले आहे. हे 140 ही मतदारसंघ 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला जिंकता आले नव्हते. म्हणून या मतदारसंघाची विशेष तयारी करणे सुरू केले आहे.

मंत्री राणे म्हणाले, 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने 303 जागा जिंकल्या होत्या. आता हे टार्गेट वाढवून 403 करण्यात आले आहे. त्या निवडणुकीमध्ये भाजपने ज्या 140 जागा गमावल्या होत्या, त्या 140 जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यापैकी शंभर जागा जिंकण्याचा भाजपचा इरादा आहे. म्हणून या पराभूत झालेल्या 140 जागांची जबाबदारी केंद्रातील प्रत्येक मंत्र्यांना दोन या पद्धतीने देण्यात आली आहे. माझ्याकडे दक्षिण गोव्याबरोबरच दक्षिण मुंबईची जबाबदारी सोपविली असून या दोन्ही जागा भाजप जिंकेल असा मला विश्वास आहे.

You cannot copy content of this page