⚡कणकवली ता.१०-: कणकवली शहरात बस स्थानकासमोर एका अज्ञात वृद्ध व्यक्तीचा मृतदेह काही दिवसांपूर्वी मिळाला होता. या व्यक्तीची ओळख पटली नव्हती. महामार्ग ठेकेदार कंपनीच्या बेपर्वाईमुळे शॉक लागून या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. पोस्टमार्टम मध्ये देखील हे स्पष्ट झाले होते. मात्र या व्यक्तीची ओळख पटत नव्हती. काल शुक्रवारी कणकवली टेंबवाडी येथील रहिवासी असलेले २८ ऑगस्ट पासून बेपत्ता झालेल्या मूळ फोंडाघाट – पावणादेवी मधील बाळकृष्ण शांताराम तावडे (वय ७०) यांच्या कुटुंबीयांनी बाळकृष्ण तावडे हे बेपत्ता असल्याबाबत खबर देण्यासाठी पोलिसात धाव घेतली होती अशी माहिती उपनिरीक्षक बापू खरात यांनी दिली. दरम्यान या बाबत पोलीस उपनिरीक्षक बापू खरात यांनी तावडे यांच्या कुटुंबीयांना बाळकृष्ण तावडे यांच्या बाबत माहिती विचारत खातरजमा केली. तसेच खातरजमा केल्यानंतर बाळकृष्ण तावडे यांचे दफन केल्यानंतर चे ठेवलेले कपडे त्यांच्या कुटुंबीयांना दाखवण्यात आले व त्यावरून अखेर ही ओळख पटली असे बापू खरात यांनी सांगितले. यानंतर बस स्थानकासमोर बाळा सावंत यांच्या हॉटेल समोरील शॉक लागून मृत्यू झालेला तो मृतदेह बाळकृष्ण तावडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. कणकवली पोलीस उपनिरीक्षक बापू खरात यांनी या अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्याकरता अनेकदा माध्यमांमधून आवाहन केले होते. बाळकृष्ण तावडे यांचा मुळगाव फोडाघाट येथे असल्याने त्यांचा मुलगा आपल्या कुटुंबासोबत गणपती करिता फोंडाघाट येथे मूळ घरी गेले होते. बाळकृष्ण तावडे हे त्यांच्या पत्नीसोबत कणकवली टेंबवाडी येथे राहत असत. २८ ऑगस्ट रोजी मुलगा मनोज तावडे यांनी वडिलांना उद्या सकाळी घेऊन फोंडाघाट येथे जायचे असल्याबाबत आपल्या आईला फोन केला होता. मात्र त्यावेळी मनोज यांच्या आईने बाळकृष्ण हे दुपारी घरातून निघून गेले ते आले नसल्याचे सांगितले. बाळकृष्ण यांना अधून मधून घरात काही न सांगता अशी निघून जायची सवय होती असे पोलिसांनी सांगितले. त्याप्रमाणे ते परत घरी येतील या शक्यतेने त्यांच्या कुटुंबीयांनी शोध चौकशी केली. नातेवाईकांकडे माहिती घेतली. मात्र त्यांचा शोध लागत नव्हता. बाळकृष्ण तावडे हे एसटी विभागामध्ये चालक या पदावर सेवानिवृत्त झाले होते. दरम्यान बाळकृष्ण यांचा मृत्यू हा शॉक लागून झाला असल्याचे पोस्टमार्टममध्ये निष्पन्न झाले होते. तसेच विद्युत निरीक्षकांकडूनही शॉक लागूनच मृत्यू झाल्याच्या घटनेला दुजोरा देण्यात आला होता. मात्र अद्याप तसा लेखी अहवाल देण्यात आलेला नाही असे श्री. खरात यांनी सांगितले. त्यामुळे जर दिलीप बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीच्या बेपर्वाईमुळे बाळकृष्ण तावडे यांचा मृत्यू झाला असेल तर संबंधित ठेकेदार कंपनीने बाळकृष्ण तावडे यांच्या कुटुंबीयांकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
कणकवली येथे शॉक लागून मृत्यू झालेल्या त्या व्यक्तीची ओळख पटली
