⚡मालवण ता.०८-: राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत नागरिकांना वाढीव वीजबिल देण्यात येत असल्याने कॉंग्रेसने देऊळवाडा येथील वीज वितरण कार्यालय येथे वाढीव वीजबिल तक्रार शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात ५३ वीज ग्राहकांच्या तक्रारी आल्या आहेत. या तक्रारी वीज अधिकाऱ्यांकडे देण्यात येणार असून त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे पदाधिकारी अरविंद मोंडकर यांनी दिली.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते साईनाथ चव्हाण, अरविंद मोंडकर, तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळू अंधारी, सेवादलाचे श्रीकृष्ण तळवडेकर, युवक काँग्रेसचे देवानंद लुडबे, पल्लवी तारी खानोलकर, गणेश पाडगावकर, योगेश्वर कुर्ले, अमृत राऊळ, ममता तळगावकर, श्रेयस माणगावकर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत नागरिकांना दरवाढीव बिल देण्यात येत आहेत. ही बिle भरायला थोडा उशीर झाला तर दीड ते दोन हजार रुपयांसाठी सुद्धा मीटर कट करण्यात येत आहे इतर आकार देखील खूप बिल लादल्याचे दिसून येत आहे. ६० युनिट पेक्षाही कमी युनिट वापर असणाऱ्या ग्राहकांना १५० ते २२५ युनिटचे बिल येत आहे. नागरिकांकडून आमच्याकडे आलेल्या तक्रारींनुसार यापूर्वी अधिकाऱ्यांना भेटूनही अधिकारी सहकार्य करत नसल्याने त्याचा निषेध म्हणून आम्ही गेल्या महिन्यात वीजबिले जाळून निषेध केला होता, आता वीज वितरण कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी आम्ही या तक्रार शिबिरात घेऊन या नागरिकांना न्याय मिळवून देत आहोत, असे अरविंद मोंडकर यावेळी म्हणाले.
