मच्छीमारांनी
होड्या सुरक्षित स्थळी हलविल्या
⚡मालवण ता.०७-: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यभरात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिमूसळधार पाऊस कोसळण्याचा तसेच राज्याच्या किनारपट्टी भागात ११ सप्टेंबर पर्यंत वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविल्याच्या पार्श्वभूमीवर किनाऱ्यालगतच्या मच्छीमारांनी या काळात मासेमारीला समुद्रात जाऊ नये, असा इशारा मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाने जिल्ह्यातील मच्छीमारांना दिला आहे. तर भागवत एकादशीमुळे समुद्रात मोठ्या उधाणाची शक्यता मच्छीमारांनी वर्तवली असून आज सायंकाळ पासूनच मेघगर्जनेसह पावसाचे आगमन झाले तर उद्यापासून वाहणाऱ्या दक्षिणेकडच्या वाऱ्याचा जोर लक्षात घेऊन मच्छीमारांनी आपल्या होड्या सुरक्षित स्थळी हलविल्या आहेत.
प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्या कडून हवामान विषयक मिळालेल्या पूर्व सूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि.७ ते ८ सप्टेंबर २०२२ या कालावधीत तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तविलेली आहे. तर दि. ९ ते ११ सप्टेंबर या कालावधीत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे. तसेच या कालावधीत ४५ ते ५५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असून त्यांचा वेग ६५ किमी प्रतितास पर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात व खाडी क्षेत्रात मासेमारीस जाऊ नये, वादळी वारे व पावसाचे हवामान योग्य होईपर्यंत कोणत्याही नौका समुद्रात जाणार नाही याची खबरदारी मच्छीमारांनी व मच्छीमार संस्थांनी घ्यावी, मच्छीमारी नौका, जाळी व इतर साहित्य सुरक्षित स्थळी ठेवावे अशा सूचना मत्स्य व्यवसाय विभागाने दिल्या आहेत.
दरम्यान, आज असणाऱ्या भागवत एकादशीमुळे समुद्राला उधाण येण्याची शक्यता स्थानिक मच्छीमारांनी वर्तविली आहे. उद्यापासून वाहणाऱ्या दक्षिणेकडच्या वाऱ्यामुळे किनारपट्टी भागात मच्छीमारांनी सावधगिरी बाळगली आहे.
