शिंदे गटाचा शिवसेनेवरील दावा गद्दारीचा नीचपणा

शिवसेना सचिव खा विनायक राऊत यांचा आरोप

मालवण (प्रतिनिधी)

मुंबई ताब्यात घेण्याचे षडयंत्र पुन्हा एकदा दिल्लीतील भाजपच्या राज्यकर्त्यांनी शिवसेनेतील गद्दार शिंदे गटामार्फत सुरू केला असला तरी तो सफल होणार नाही असे सांगतानाच शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी शिवसेनेवर हक्क सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या शिंदे गटाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविण्याच्या मागणीची याचिका न्यायालयाकडे करून आपली शिवसेना ही खरी शिवसेना नाही आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे हे एक प्रकारे मान्य केले आहे. खऱ्या शिवसेनेवर हक्क सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिंदे गटाने केलेली ही मागणी म्हणजे त्यांचा दुटप्पीपणा असून गद्दारीचा निचपणा असल्याचा घणाघात त्यांनी केला

गणेशोत्सवानिमित्त शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत हे तळगाव येथील आपल्या निवासस्थानी आले असता त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खास. राऊत म्हणाले, शिवसेनेचा राष्ट्रीय कार्यकारीणीतील ९५ टक्के सदस्यांचा उद्धव ठाकरे यांना असलेला पाठिंबा आणि शिवसेनेची कायदेशीर घटना पाहता हे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविण्याचे धाडस करेल असे वाटत नाही. न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयात हा निर्णय आहे तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय न घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश योग्य आहेत. शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगाकडे मजबूत बाजू मांडलेली आहे. आमची बाजू सत्याची आहे, त्यामुळे शिवसेनेच्या अस्तित्वाला धोका नाही, संपूर्ण देशाच्या लोकशाहीवर परिणाम करणारा हा खटला असल्याने तो जलदगतीने चालवावा, संविधान संदर्भात निर्माण झालेल्या घटनात्मक पेचावर मार्ग काढावा, अशी आमची मागणी आहे, असेही खास. राऊत म्हणाले.

देशात नेमकं काय चालले आहे याबाबत आमच्या बरोबर देशातील सर्व घटनातज्ञ हे चिंतेत आहेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान देशात आहे की त्याला धोका निर्माण होतोय असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालय इतर खटल्यांसाठी मध्यरात्री दरवाजा उघडून बसले मात्र दुसरीकडे देशाच्या घटने संदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नांबाबत तारीख पे तारीख होत आहे यामुळे देशवासीय चिंतेत आहेत, असेही खास. राऊत म्हणाले.

शिवसेनेने दसरा मेळावा काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत करावा हे सांगण्याचे धाडस शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी करू नये, ज्यांची पार्श्वभूमी बाटग्यांची आहे, गद्दारांची आहे त्यांनी आम्हाला सल्ले देऊ नये, त्यांच्या सल्ल्यांची आम्हाला गरज नाही,त्यांनी देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे ना सल्ले द्यावेत, तुम्ही सुद्धा राज ठाकरे यांच्याकडे जाऊन त्यांचे पाय पकडता, आणि मेळाव्यात येऊन भाषण करण्यासाठी आमंत्रित करता यातच शिंदे गटाचे दळभद्री विचार दिसून येतात, अशी टीका खास. राऊत यांनी केली.

सिंधुदुर्ग रत्नागिरी मधील शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आहे. येथे आमच्या कोणाची जहांगीरी नाही. पैशाने येथे राजकारण होत नाही, बाळासाहेबांच्या विचाराने राजकारण होते. येथील शिवसेना मजबूत आहे आणि ती उद्याही मजबूत राहणार आहे. नारायण राणे यांच्यासारख्या बलाढ्य राजकारण्याला देखील सिंधुभूमीने झोपवून जागा दाखवून दिली आहे. तर शिंदे गटाचे काय ? असा सवाल खास. राऊत यांनी करत मुंबई महाराष्ट्रात ठेवण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत १०५ हुतात्म्यांना बलिदान दिले, यामध्ये त्यात सिंधुदुर्ग रत्नागिरी मधील हुतात्म्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी हा भाग बाळासाहेबांच्या विचारांनी चालणारा भाग असून पैशाच्या आमिषापोटी वाहून जाणारा नाही, असेही खास. राऊत म्हणाले.

शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी अभेद्य आहे. शिवसेना संकटात असली तरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ज्या ज्या ठिकाणी आघाडी करणे शक्य आहे त्या त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर घटक पक्षांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. तसेच विधानसभा व लोकसभा निवडणुकीतही आघाडी करण्याबाबत त्यावेळी निर्णय घेतला जाईल असे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी विधानसभा मतदार संघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचाच आमदार निवडून येईल हेच सत्य आहे आणि ते दिसून येईल, असा दावा यावेळी खास. राऊत यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे ईडी सरकार असून ठाकरे सरकारने १ एप्रिल पासून मंजूर केलेल्या कामांना स्थगिती दिली, यामुळे अल्पसंख्याक, मागासवर्गीय, अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी ठाकरे सरकारने केलेल्या निधीची तरतूद स्थगित झाल्याने या घटकातील विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यांना पालकमंत्री शहर व गाव विकासासाठी विविध योजनांचा पैसा अखर्चित राहिला आहे, ईडी सरकारचे लक्ष केवळ मुंबईतील मोठ्या प्रकल्पांकडे असून त्यातून पैसा ओरबडण्याची आणि गरीब जनतेच्या तोंडातील घास काढून घेण्याची रणनीती या सरकारची आहे, त्यामुळे सामान्य जनतेला या सरकारकडून न्याय मिळण्याची शक्यता नाही, अशी टीका खास. राऊत यांनी केली. तसेच सध्याच्या राज्यपाल पदावरील व्यक्तीकडून अशोभनीय असे कृत्य होत असून पक्षीय राजकारण राजभवनातून होत आहे, सत्ताधारी पक्षाच्या वतीने अंगठा उमटविण्याचे काम राज्यपालांकडून होत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

तसेच जी बदमाश, गद्दार वृत्ती वाढत चालली आहे अशा वृत्तीला धडा शिकवून प्रामाणिक काम करणाऱ्या भक्त मंडळींना आधार व संरक्षण द्यावे असे साकडे आपण गणपती बाप्पाच्या चरणी घातले आहे, असे यावेळी खास. राऊत यांनी सांगितले.

You cannot copy content of this page