बांद्यातील युवकांनी प्रसंगावधान राखल्याने बालंबाल बचावले
*💫बांदा दि.२८-:* मुंबई – गोवा महामार्गावरील तोरसे (गोवा) येथे कर्नाटकहून गोव्यात पर्यटनासाठी जाणाऱ्या कारला अपघात झाला. महामार्गाचे काम सुरु असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार अपघातग्रस्त झाली. दरम्यान गोव्याहून बांद्याच्या दिशेने दुचाकीने येणारे बांद्यातील युवक प्रसंगावधान राखल्याने बालंबाल बचावले. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. कारमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. हा अपघात बुधवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातानंतर स्थानिकांनी मदतकार्यात सहभाग घेतला. याबाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटक राज्यामधील युवक आपल्या ताब्यातील (केए२३ एम ९८९५) ह्या कारने गोव्यात जात होते. दरम्यान तोरसे गोवा येथे आले असता रस्त्याचा अंदाज न आल्याने कार पलटी होऊन अपघात झाला. कार पलटी होऊन तब्बल १०० फूट दूर फरफटत गेली. यात गाडीच्या दर्शनी भागाचे फार मोठे नुकसान झाले. कारमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. अपघाता नंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना कारमधून बाहेर काढले. दरम्यान गोव्याहून कामावरुन घरी परतणारे युवक अपघातादरम्यान बांद्यात परतत होते. सुदैवाने गाडी पलटी होऊन महामार्गाच्या बाहेर फेकली गेल्याने अनर्थ टळला.
