मालवण दि प्रतिनिधी
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत आज मालवणात गणेशोत्सवाच्या सहाव्या दिवशी गौरी गणपतीचे भक्तीपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. महिलांनी गौरीचे विधिवत पूजन करून तर श्री गणेशाची महाआरती करत गणेश भक्तांनी लाडक्या बाप्पाला व गौरीला निरोप दिला.
मालवणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. गणेश चतुर्थी दिवशी सर्वत्र गणरायाचे जल्लोषात आगमन झाल्यावर शनिवारी अनेक घरांमध्ये गौरीचेही आगमन झाले. गौरी गणपतीची मनोभावे सेवा केल्यानंतर आज सहाव्या दिवशी मालवणात विविध ठिकाणी गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले. श्री गणरायाचा जयघोष करत, पारंपारिक वाद्ये वाजवत तर कुठे बेंजोच्या तालावर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गणेश भक्तांनी विसर्जन मिरवणूका काढल्या. मालवण बंदर जेटी, चिवला बीच, दांडी किनारा, देऊळवाडा व्हाळ, कोळंब खाडी आदी विविध विसर्जन स्थळी गौरी गणपतीचे विसर्जन करून निरोप देण्यात आला. यावेळी गणेश भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. यानिमित्त मालवणात विविध मोक्याच्या ठिकाणी तसेच विसर्जन स्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
