समाजाच्या विकासासाठी सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करा

नायब तहसीलदार शिवाजी राठोड यांचे आवाहन

⚡कणकवली ता.२८-: सध्याच्या युवापिढीमध्ये सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या खूपच कमी व्यक्ती आहेत. मात्र,आपल्या समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शशिकांत इंगळे व सहकाऱ्यांनी आयोजित केलेला गुणगौरव कार्यक्रम कौतुकास्पद आहे. यापुढेही असेच समाजाच्या विकासासाठी सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करा,असे आवाहन कणकवलीचे नायब तहसीलदार शिवाजी राठोड यांनी केले.

भटके-विमुक्त हक्क परिषद, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडी जिल्हा सरचिटणीस शशिकांत इंगळे यांच्या पुढाकारातून भटके विमुक्त समाजातील गुणवंतांचा सत्कार समारंभ कणकवली येथील श्री चौंडेश्वरी सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या दरम्यान भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे ,अखिल भारतीय कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष शांताराम गोसावी,जिल्हा कार्यकारणी सदस्य रवींद्र चव्हाण, कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.धर्माधिकारी , डॉ. शिकलगार , पुरवठा विभागाचे कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप होळकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गोंधळी समाजाचे जिल्हाध्यक्ष देविदास इंगळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून समाज बांधवांच्यावतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर इयत्ता दहावीत कावेरी कांबळे हिने ९१ टक्के गुण मिळवून उज्वल यश संपादन केल्याबद्दल तसेच हुबळी येथे झालेल्या क्रिकेट सामन्यांमध्ये आदित्य इंगळे यांनी ५४ चेंडू मध्ये २०५ धावा काढून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. भक्ती इंगळे हिची प्रो कबड्डी मध्ये निवड झाल्याबद्दल व बॉडी बिल्डर स्पर्धेमध्ये जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळविल्याने परशु पुजारी यांचाही सत्कार करण्यात आले. ज्यूदो कराटे मध्ये संभाजी पाचंगे याने राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल तसेच अनिल नन्नवरे यांनी कोल्हापूर येथे झालेल्या ४०० मीटर धावणे स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल सत्कार झाला. यावेळी समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर समाजातील पदवीधर विद्यार्थ्यांना व सामाजिक कार्यकर्ते अमित माळी व नाना वाघमोडे यांना गौरविण्यात आले. कोविड काळामध्ये जीवाची कोणतीही पर्वा न करता दिवस रात्र रुग्णांना सेवा दिल्याबद्दल डॉ.सी.एम. शिकलगार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्राथमिक शाळेचे शिक्षक संतोष कांबळे यांचाही सत्कार करण्यात आला. शशिकांत इंगळे म्हणाले ,आपण सर्वांनी यापुढेही मला अशीच साथ द्या. फक्त बोलून नाही तर कृतीतून समाजासाठी भरीव असे काम करून दाखवतो.आपण सर्वांनी एकजूट होऊन समाजाला प्रगतीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करूया. शांताराम गोसावी, नवलराज काळे यांनीही मनोगत व्यक्त केले. अमोल जमदाडे यांनी सूत्रसंचालन केले.

You cannot copy content of this page