नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करत गणेशोत्सव उत्साहात साजरा करावा

तहसीलदार अजय पाटणे

⚡मालवण ता.२३-: गणेशोत्सव हा मोठा सण असून कोरोना महामारीच्या वर्षानंतर यावर्षी हा सण उत्साहात साजरा होणार आहे. मालवणात गणेशोत्सव कोणतेही विघ्न न येता साजरा होण्यासाठी वीज विभाग, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, व्यापारी दुकानदार वर्ग, ट्रॅव्हल्स बस व रिक्षा व्यावसायिक व इतर घटकांना आवश्यक त्या सूचना दिल्या असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून गणेशोत्सव उत्साहात साजरा करावा, असे आवाहन मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांनी येथे बोलताना केले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण पोलीस ठाण्याच्या बहुउद्देशीय सभागृह येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीस तहसीलदार अजय पाटणे, मालवण नगरपालिका मुख्याधिकारी संतोष जिर्गे, पोलीस उपनिरीक्षक झांजुर्णे, सागरी सुरक्षा शाखा ओरोसचे प्रभारी पोलीस निरीक्षक मालवण अनिल जाधव, आचरा प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आचरे कुलदीप पाटिल यांसह माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, महेश कांदळगावकर, दीपक पाटकर, आगारव्यवस्थापक सचेतन बोवलेकर, नगरपालिका अभियंता सुधाकर पाटकर, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. अनुप पळसंबकर, विस्तार अधिकारी पी. डी. जाधव, डॉ. श्यामराव जाधव, मदन कांबळे, संभाजी पराडकर, उद्धव देसाई, शेखर यादव, दादा वाघ, गणेश पाडगावकर आदी तसेच पोलीस कर्मचारी, ट्रॅव्हल्स बस व्यावसायिक, महावितरणचे अधिकारी, बेंजो व लाऊड स्पीकर व्यावसायिक आदी उपस्थित होते.

मालवणात गणेशोत्सवासाठी दि. २९ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीसाठी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात यावे, ट्रॅव्हल्स बसेसना मार्ग व पार्किंगची सोय करावी, बाजारपेठेत गर्दी व वाहतूक नियंत्रणासाठी ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करावे, गणेशोत्सवात वीज पुरवठा अखंडित रहावा, रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत अशा विविध सूचना यावेळी मांडण्यात आल्या. तर सुदेश आचरेकर यांनी मालवणात वीज पुरवठ्याबाबत सुव्यवस्था असणे गरजेचे आहे आणि तक्रार घेण्यासाठी वीज कार्यालयात एक माणूस कायम ठेवावा, स्ट्रीट लाईट वेळच्यावेळी पेटविण्यात याव्यात, गणपतीचे विसर्जन करताना कोणताही अडथळा येऊ नये अशा सूचना मांडल्या.

यावेळी अजय पाटणे म्हणाले, कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या काळानंतर यावर्षी मोठ्या संख्येने चाकरमानी भाविक मालवणात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठेत गर्दी होऊन वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. बाजारपेठेत गाड्या पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांना व्यापार व दुकानदार यांनी सूचना देऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सहकार्य करावे. रिक्षा व्यावसायिकांनी देखील गर्दीच्या ठिकाणी रिक्षा पार्किंग करू नये. चतुर्थीच्या आदल्या दिवशी भरणारा फुलपत्री बाजार नेहमीप्रमाणे भरणार असून यावेळी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणेने खबरदारी घ्यावी. बेंजो व लाऊड स्पीकर व्यावसायिकांनी गणेश मिरवणूकांमध्ये चांगले वातावरण ठेवावे. वीज महावितरण मंडळाने वीज खंडित होणार नाही याची काळजी घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यरत ठेवावे. सर्व नागरिकांनी सहकार्य करून गणेशोत्सव आनंदात व उत्साहात साजरा करावा, असेही यावेळी तहसीलदार अजय पाटणे म्हणाले.

You cannot copy content of this page