पौर्णिमा गौतम यांचे प्रतिपादन…
सावंतवाडी ता.१४-:
महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अनेक ताणतणावांना सामोरे जावे लागते. या स्पर्धेच्या युगात मन उद्विग्न होतेच. त्यामुळे मानसिक स्थिरता, मनःशांती आणि अभ्यासात एकाग्रतेसाठी ध्यान साधनेसह द्विहृदय ध्यान (ट्वीन हार्ट मेडिटेशन) पद्धतीची गरज आहे. असे प्रतिपादन दिल्ली येथील गोल्डन मिरॅकल एनर्जी हिलींग सर्व्हिसेसच्या प्रमुख पौर्णिमा गौतम यांनी केले.
सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थीनींसाठी आयोजित ध्यान – परिचय व प्रशिक्षण कार्यक्रमात पौर्णिमा गौतम बोलत होत्या. यावेळी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रविणकुमार ठाकरे उपस्थित होते. सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय व यशवंतराव भोंसले कॉलेज ऑफ फार्मसी तसेच ओटवणे येथील श्री रवळनाथ विद्यामंदिर या तीन ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी पौर्णिमा गौतम यांनी महाविद्यालयीन तरुण तरुणींसाठी आवश्यक अश्या द्विहृदय ध्यान (ट्वीन हार्ट मेडिटेशन) पद्धतीची सविस्तर माहिती देऊन सर्वसंधी संचालनानंतर प्रात्यक्षिक देखील करून घेतले. या दोन्ही महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी व प्राध्यापकांनी यात सहभाग घेतला. तसेच ओटवणे येथे “ध्यानसाधनेचे विद्यार्थी जीवनातील महत्व” या विषयावर मार्गदर्शन करीत विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या सुपर ब्रेन योगाचे प्रात्यक्षिकासहीत मार्गदर्शन केले.
यावेळी भाईसाहेबसावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ विकास कठाने, डॉ शीतल पाटील, डॉ प्रणाली नागदेवे, डॉ मुग्धा ठाकरे, डॉ सरफरे, डॉ चौगुले, भोसले फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ विजय जगताप, प्रा. सौ गायत्री महाबळ – आठलेकर, ओटवणे हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र देसाई, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. तीन ठिकाणी घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे नियोजन प्रतिष्ठानचे डॉ सौ मुग्धा ठाकरे, डॉ प्रविणकुमार ठाकरे, दीपक गावकर, सिद्देश मणेरीकर यांनी केले.
