उद्या प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान
*💫ओरोस दि.२५-:* सिंधुदुर्गनगरी येथे बॉम्ब शोध व नाशक पथकामध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पुंडलिक साटम यांना त्यांच्या कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. यावर्षी राष्ट्रपती पदक प्राप्त करणारे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव अधिकारी असून उद्या प्रजासत्ताक दिनी पोलीस परेड मैदानावर पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील ५७ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गौरवपुर्ण कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला जाहीर झालेल्या ५७ जणांमध्ये सिंधुदुर्गातील एकमेव अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सिंधुदुर्गनगरी येथे बॉम्ब शोध व नाशक पथकामध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय साटम यांच्या यात समावेश आहे. संजय साटम यांनी १९८८ साली पोलीस दलात सेवा सुरू केली. त्यांनी गडचिरोली, ठाणे शहर येथे सेवा करत असताना सिंधुदुर्गात त्यांची बदली झाली. ३३ वर्षाच्या सेवेत साटम यांना आतापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगली कामगिरी केल्याबद्दल २७ प्रमाणपत्रे, ४२८ बक्षिस मिळाली आहेत. यापूर्वी २०१७ मध्ये पोलीस महासंचालकांकडून उत्कृष्ठ सेवेबद्दल पदक देऊन गौरविण्यात आले आहे. बॉम्ब शोधक नाशक पथकात काम करत असताना त्यांनी भारतातील सर्व प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले असून या प्रशिक्षणामुळे कोकण रेंजमधील शेकडो स्फोटके तातडीने नाश करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजाविली आहे. नांगरतास धरणातील बॉम्ब स्फोटके बेळगाव-गोवा हायवेवर पुरून ठेवलेला बॉम्ब, घावनळे-कुडाळ येथे मिळून आलेला बॉम्ब निकामी करण्यात संजय साटम यांनी लावलेले कौशल्य महत्वपूर्ण ठरले आहेत. वाशी-नवीमुंबई येथील विष्णूदास भावे नाट्यगृहातील बॉम्ब निकामी करत त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती. आपल्या कौशल्याचे प्रशिक्षण ते सिंधुदुर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ते सातत्याने देत आले आहेत.
