महाराणी ताराराणी यांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यातील वास्तव्यामागील सत्य समजून घ्यावे – ज्योती तोरसकर

⚡मालवण ता.१२-: मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यातील राणीची वेळ या ठिकाणी महाराणी ताराबाई या विश्रांती साठी आल्या होत्या, असे मत प्रचलित आहे. परंतु महाराष्ट्रात अराजकाची परिस्थिती असताना वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी ताराबाईंनी स्वराज्याची धुरा आपल्या हातात घेतली आणि मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी मोठा संघर्ष केला. त्यातील रांगणा किल्ल्यावर वेढा पडल्यावर महाराणी सिंधुदुर्ग किल्ल्यावर वास्तव्यास आल्या आणि इथून त्यांनी पुढील राजकीय आणि लढाईचे डावपेच आखून त्यांची कार्यवाही केली, हा खरा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे, महाराणी ताराराणी यांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यातील वास्तव्यामागील सत्य समजून घेतले पाहिजे असे प्रतिपादन मालवण मधील इतिहास अभ्यासक सौ. ज्योती बुवा- तोरस्कर यांनी येथे बोलताना केले.

हर घर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात ९ ते १७ ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा एक भाग म्हणून “महाराणी ताराराणी यांचे सिंधुदुर्ग किल्याच्या इतिहासातील योगदान” या विषयावर महाविद्यालयाच्या कॉमर्स असोसिएशन ने नरहरी प्रभू झांट्ये सभागृहात व्याख्यानाचे आयोजन केले होते. मालवण मधील इतिहास अभ्यासक ज्योती बुवा यांनी महाराणी ताराराणी यांचे सिंधुदुर्ग किल्ल्यामधील वास्तव्य नेमके कोणत्या कारणांसाठी होते, याची विविध दाखले देत आपल्या व्याख्यानातून मांडणी केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस समन्वयक डॉ. सुमेधा नाईक यांनी प्रास्ताविक करताना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना त्यामागील इतिहासाचे महत्व अधोरेखित करत कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सामंत यांनी ज्योती बुवा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

विद्यार्थ्यानी स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे, त्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते १९७४ साली स्वातंत्र्य मिळेपर्यंत ज्यांनी लढा दिला त्या सर्वांचे आपण स्मरण केले पाहिजे, असे मत डॉ. उज्वला सामंत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. प्रा. प्रमोद खरात यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. बी. एच. चौगुले यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी डॉ. सुमेधा नाईक, प्रा. बी. एच. चौगुले, प्रा. एच. एम. चौगले,डॉ. डी. व्ही. हारगिले, डॉ. एम. आर. खोत, प्रा. कैलास राबते, प्रा. स्नेहा बर्वे आदी उपस्थित होते. महाविद्यालयातील २४३ विद्यार्थ्यानी या व्याख्यानाचा लाभ घेतला.

You cannot copy content of this page