सीमेवरील सैनिक, अन्नदाता बळीराजा, जीवनातील गुरु यांचा आदर बाळगा – प्रा. रुपेश पाटील

⚡सावंतवाडी ता.१२-: :* आपण जीवन जगत असताना आपली रक्षा करणारे सीमेवरील सैनिकांना, जगाचे अन्नदाते अर्थातच शेतकरी बांधव आणि आपल्या जीवनाला विधायक दिशा देणारे आपले गुरु, शिक्षक यांचे ऋण कधीही मिळू शकत नाही, मात्र त्यांच्या प्रती आपण नेहमीच उतरायी होण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी व्यक्त केले.

मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वतीने ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त’ आयोजित व्याख्यानात प्रा. पाटील बोलत होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील, प्रा. गणेश उज्वले, प्रा.सचिन राजाध्यक्ष, प्रा. डॉ. योगेश महाडिक, प्रा. दत्तप्रसाद गोलतकर यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते.
आपल्या व्याख्यानातून प्रा. रुपेश पाटील यांनी स्वातंत्र्यांच्या प्राप्तीनंतर आपण काय कमावले व काय गमावले? याचा मागोवा घेतला.
प्रा. पाटील पुढे म्हणाले की, आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या तमाम क्रांतिकारकांचे आभार मानले पाहिजेत. आपल्या देशाला आज जे काही सौख्य प्राप्त होत आहे, त्याचे श्रेय स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेऊन आपले प्राण त्यागणाऱ्या अनेक क्रांतिकारकांना जाते.
तसेच आजच्या घडीला आपण आपल्या सीमेवर लढणाऱ्या जवानांचे देखील मनापासून आभार मानले पाहिजेत. कारण ते सीमेवर सक्षमपणे उभे असल्यामुळे आपण आपल्या घरी सुरक्षित आहोत. त्याचप्रमाणे आपण जगाचा पोषणकर्ता अर्थातच बळीराजा शेतकऱ्याचेही आभार मानले पाहिजेत. कारण आपल्या कष्टातून आम्हाला सुपीक असे अन्नधान्य आमचे शेतकरी बांधव देत असतात.
त्याचबरोबर आपण आपल्या जीवनाला महत्त्वाची शिकवण देणारे आमच्या शिक्षकांविषयी कायमच आदर बाळगला पाहिजे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्लास्टिक मुक्त भारत करण्यासाठी आपण आपापल्या पद्धतीने योगदान द्यावे आणि स्वच्छता अंगीकारावी, असेही आवाहन प्रा. रुपेश पाटील यांनी केले. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या व्याख्यानाचा लाभ महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. योगेश महाडिक यांनी केले.

You cannot copy content of this page