आंबोली, राधानगरी मार्गे वाहतूक वळविली
वैभववाडी संजय शेळके
गगनबावडा तालुक्यात मांडूकली नजीक राष्ट्रीय महामार्गावर पुराचे पाणी आल्याने सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातून होणारी वाहतूक आंबोली व राधानगरी घाट मार्गे वळविण्यात आली आहे.
सर्वत्र गेले चार दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा फटका पश्चिम महाराष्ट्र व कोकण यांना बसला आहे. घाटमाथा व कोकण यांना जोडणारा दुवा म्हणून करूळ घाट ओळखला जातो. परंतु दोन दिवसांपूर्वी घाटातील संरक्षक भिंत कोसळल्याने संबंधित प्रशासनाने हा मार्ग वाहतुकीस बंद केला आहे.
मंगळवारी पहाटे सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्गावर गगनबावडा तालुक्यातील मांडूकली गावात राष्ट्रीय महामार्गावर पुराचे पाणी आले. कुंभी धरणाचे पाणी सोडल्याने कुंभी नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे. रस्ता पाण्याखाली गेल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कोल्हापूरहून सिंधुदुर्गात येणारी वाहने राधानगरी मार्गे येत आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून होणारी वाहतूक आंबोली व फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली आहे. पावसाने जोर असाच कायम ठेवल्यास सिंधुदुर्ग – कोल्हापूर हा मार्ग अनिश्चित काळासाठी बंद राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
फोटो – गगनबावडा तालुक्यात मांडूकली नजीक महामार्गावर आलेले पुराचे पाणी
