तहसीलदार अजय पाटणे;हुतात्मा प्रभाकर रेगेंना वाहिली आदरांजली
⚡मालवण ता.०९-: क्रांतिवीरांनी देशासाठी दिलेल्या बलिदानामुळेच आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. आपल्या पूर्वजांचे बलिदान आपण व्यर्थ घालवता नये. आजच्या युवा पिढीने क्रांतिवीरांच्या बलिदानातून देशाप्रती त्याग भावनेची प्रेरणा घ्यावी. क्रांतिवीरांच्या बलिदानाची जाणीव ठेवून युवा पिढीने देशाच्या विकासात हातभार लावावा, असे प्रतिपादन मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांनी येथे बोलताना केले.
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त कुंभारमाठ येथील हुतात्मा प्रभाकर रेगे स्मारक येथे तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते हुतात्मा रेगे यांच्या स्मारकावर पुष्पचक्र वाहून तसेच त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. तसेच यावेळी राष्ट्रगीत म्हटल्यावर स्वातंत्र्य लढ्यात शहिद झालेल्या क्रांतिवीर हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी रेकोबा हायस्कूलच्या विद्यार्थीनीने महात्मा गांधीजींचा संदेश वाचून दाखवला.
यावेळी तहसीलदार अजय पाटणे व माजी मुख्याध्यापक श्री. शिंदोळकर यांनी विचार मांडत मार्गदर्शन केले. स्वातंत्र्य लढ्यात आपले योगदान देणाऱ्या मालवण मधील स्वातंत्र्यसैनिक व हुतात्म्यांची माहिती असणारे फलक मालवण तहसील कार्यालय आणि फोवकांडा पिंपळपार येथे लावण्यात येणार असून याद्वारे त्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहचण्यास मदत होईल असे यावेळी तहसीलदार अजय पाटणे यांनी सांगितले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्री. झांजुर्णे, गटविकास अधिकारी आपासाहेब गुजर, उपसरपंच किशोर पवार, रेकोबा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. शिंदोळकर, कृषी विस्तार अधिकारी श्री. जाधव, रेकोबा हायस्कूलचे शिक्षक श्री. फणसेकर, श्री. कोरे सर व कर्मचारी यशवंत गावकर, पोलीस पाटील श्री. बावकर, आरोग्य सेवक श्री. नातेवाड, मालवण तलाठी व्ही. एन. पास्ते, मंडळ अधिकारी पी. डी. लोबो, ग्रामसेवक नलावडे, कुंभारमाठ तलाठी दिलीप ठाकूर, बॅ. नाथ पै सेवांगणचे कार्यकर्ते, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
