⚡बांदा ता.०९-:
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत स्वराज्य महोत्सवास आजपासून सुरुवात झाली. त्यांतर्गत आज ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून बांदा शहरातील विविध चौकात, वाड्यात, प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये तसेच शासकीय कार्यालयात सकाळी ठीक ११ वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन झाले. या उपक्रमात शहरातील हजारो ग्रामस्थांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला.
शहरात ग्रामपंचायत कार्यालय, कट्टा कॉर्नर, गांधी चौक, गाडगेवाडी, जुना स्टॅन्ड, बांदेश्वर मंदिर चौक, पिंपळेश्वर गणपती मंदिर, नट वाचनालय, पोलीस ठाणे, निमजगा शाळा, बांदा केंद्रशाळा, व्ही. एन. नाबर स्कुल, खेमराज स्कुल, बांदा शहरातील सर्व मशीद, पानवळ, ओवेस कॉम्प्लेक्स, साई मंदिर, तेली तिठा, गवळीटेम्ब येथे नागरिक, शिक्षक, विद्यार्थी, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी सामूहिकरित्या राष्ट्रागीताचे गायन करत सन्मान केला. गावातील मंदिरे व मशिदीनीही आपल्या ध्वनीक्षेपकाद्वारे राष्ट्रगीत प्रसारित केले. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन ग्रामपंचायतने केले होते. त्यानुसार शहरातील हजारो नागरिक उस्फुर्तपणे सहभागी झाले होते.
राष्ट्रगीत झाल्यानंतर शहरात ठिकठिकाणी देशभक्तीपर गिते लावण्यात आल्याने पूर्णपणे देशभक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अक्रम खान व प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. शहरातील सर्व ग्रामपंचायत सदस्य आपापल्या प्रभागात राष्ट्रगीत गायनासाठी उपस्थित होते.
बांदा येथे विविध ठिकाणी राष्ट्रगीत गायन करत स्वराज्य महोत्सवाला प्रारंभ
