ग्रामसभेत निर्णय: ८ ते १७ ऑगस्ट कालावधीत आयोजन
बांदा
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्षानिमित्त हर घर तिरंगा उपक्रमातर्गत बांदा शहरात ८ ते १७ ऑगस्ट या कालावधीत भरगच्च कार्यक्रम राबविण्याचा निर्णय आज झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला. शासनाच्या परिपत्रकानुसार एकूण १९ सर्वसामावेशक उपक्रम राबविण्यासाठी सावंतवाडी तालुक्यात बांदा शहर ग्रामपंचायतची शासनाच्या वतीने निवड करण्यात आल्याने याचे प्रभाग निहाय नियोजन करण्यासाठी सोमवारी ८ रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बांद्याची तहकुब ग्रामसभा आज सकाळी सरपंच अक्रम खान यांच्या अध्यक्षतेखाली सभागृहात घेण्यात आली. यावेळी ग्रामविस्तार अधिकारी सौ. लीना मोर्ये, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, बाळू सावंत, श्यामसुंदर मांजरेकर, राजेश विरनोडकर, किशोरी बांदेकर, रिया आलमेडा, उमंगी मयेकर, स्वप्नाली पवार, पोलीस कर्मचारी सिद्धार्थ माळकर, संजय हुंबे आदी उपस्थित होते.
यावेळी शासनाच्या परिपत्रकाचे वाचन करण्यात आले. तसेच ८ ते १७ ऑगस्ट या कालावधीत घराच्या समोर रांगोळी, प्रभातफेरी, स्वातंत्र्य सैनिक तसेच माजी सैनिकांचा सत्कार, स्वच्छता मोहीम, महिला मेळावा, कृषी मेळावा, बचतगत मार्गदर्शन, सेंद्रिय शेती मार्गदर्शन, पर्यावरण संवर्धन शपथ, वृक्षारोपण, शाळा स्तरावर वेशभूषा तसेच देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, सांस्कृतिक तसेच देशभक्तीपर प्रबोधन कार्यक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले.
१५ ऑगस्ट रोजी शहरातील सर्व शाळातील विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. देशभक्तीपर वातावरण निर्माण व्हावे यासाठी शहरातील चौकाचौकात १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रगीत लावण्यात येणार आहे. माजी सैनिक, प्रगतशील शेतकरी यांचे सत्कार करण्यात येणार आहेत. शहरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयात विविध नेत्यांच्या जीवनावर वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार असून स्पर्धेतील विजेत्यांचा १७ ऑगस्ट रोजी समारोप कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार आहे. १७ रोजी सायंकाळी ४ वाजता आनंदी मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.
हर घर तिरंगा या उपक्रमातर्गत ग्रामपंचायतच्या वतीने ३ हजार तिरंगे शहरातील नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तिरंगा १३ रोजी सकाळी सर्वांनी आपल्या घरावर फडकवायचा असून १५ रोजी सायंकाळी सन्मानाने उतरवायचा आहे. यासाठी तिरंगा उभारण्याची संहिता वाचून दाखविण्यात आली. तसेच सहीतेचे पत्रक घरोघरी माहितीसाठी वाटण्यात येणार आहे. शहरातील सर्व नागरिकांनी, युवा, सांस्कृतिक मंडळे, बचतगत, शाळांनी उस्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन सरपंच अक्रम खान यांनी यावेळी केले. यावेळी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने चर्चेत सहभाग घेतला.
फोटो :-
बांदा ग्रामसभेत माहिती देताना सरपंच अक्रम खान. (छायाचित्र – निलेश मोरजकर)
