संचालक शिक्षण विस्तार डॉ उत्तम महाडकर यांचे प्रतिपादन;छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय ओरोसला दिली भेट
⚡ओरोस ता.३१-: ओरोस येथील छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालया मध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे संचालक विस्तार शिक्षण, डॉ. उत्तम महाडकर यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी कृषी पदवीचे विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. उच्च शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी आपल्या शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे आपले आचार व विचार सुधारतात. चांगला बुद्यांक वाढविण्यासाठी व्यक्तिमत्व विकासाची मोठी गरज असते असे ते म्हणाले. शिक्षण व झोप व्यतिरिक्त मिळणारा इतर वेळ हा आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी खर्च केल्यास माणसाचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. ज्ञाना सोबतच शरीराचा व मनाचा विकास साधण्यासाठी नियमितपणे व्यायाम, प्राणायाम व योगा करावा, त्याला अध्यात्माची जोड द्यावी व सुखी आणि समृद्ध जीवन जगावे व स्वत: च्या आणि देशाच्या विकासासाठी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांना केले.
शेती ही आपल्या देशाची संस्कृती आहे. ती विकसित करण्यासाठी कृषी पदवीधरांची मोठी जबाबदारी आहे असे ते म्हणाले. त्यांच्या हस्ते कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर वृक्ष लागवड करण्यात आली. कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या वृक्ष लागवड अभियानाची माहिती घेऊन त्यांनी समाधान व्यक्त केले. स्वत: वृक्ष लागवड करून सहभाग नोंदविला. वृक्ष लागवडी सोबतच त्यांच्या संवर्धनाची पण काळजी घ्यावी असे ते म्हणाले. कृषी शिक्षणाचा आढावा घेऊन त्यांनी महाविद्यालयाद्वारे तयार केलेल्या फळ प्रक्रिया पदार्थांची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. खरोखरच या महाविद्यालया मधून विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख शिक्षण मिळत असल्याचे सांगून सर्वांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. स्नेहा सामंत, उपप्राचार्या सौ. भावना पाताडे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ बाळकृष्ण गावडे, डॉ. विलास सावंत, डॉ. केशव देसाई, कृषि महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी व कृषी पदवीधर उपस्थित होते.
