Headlines

महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी; कर्नाटकची ‘सुलतान’ नौका जप्त…

*दोनदा निसटलेल्या नौकेला तिसऱ्या प्रयत्नात पकडले;तांडेलसह सात खलाशी जाळ्यात,मंत्री नितेश राणे यांच्या कठोर भूमिका,कारवाईची मोहीम अधिक गतिमान

⚡देवगड ता.०३-: महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे. कर्नाटकातील मलप्पे बंदरातील ‘सुलतान (Sulthan)’ ही ट्रॉलर नौका देवगडसमोरील समुद्रात बेकायदा ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करताना पकडून जप्त करण्यात आली. २ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही थरारक कारवाई करण्यात आली. नौकेवर तांडेलसह एकूण सात खलाशी होते. जप्त करण्यात आलेली नौका देवगड बंदरात आणण्यात आली असून तिच्याविरोधात कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या परप्रांतीय नौकांच्या घुसखोरीविरोधातील कठोर भूमिकेमुळे आणि विभागाच्या अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या चिकाटीमुळे ही कारवाई यशस्वी झाली असून स्थानिक मच्छिमारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

२ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास मत्स्यव्यवसाय विभागाचे पथक नियमित सागरी गस्त घालत असताना मुणगे समोरील समुद्रात किनाऱ्यापासून सुमारे ५ ते ६ नॉटिकल मैल अंतरावर ‘सुलतान’ ही नौका वैध परवान्याशिवाय ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करताना आढळून आली. विभागाच्या गस्ती नौकेला पाहताच संबंधित नौकेने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गस्ती पथकाने हार न मानता नौकेचा पाठलाग सुरू केला. अखेर देवगडसमोरील समुद्रात या नौकेला रोखण्यात आणि ताब्यात घेण्यात अधिकाऱ्यांना यश आले.
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ आणि सुधारित अधिनियम २०२१ मधील तरतुदींनुसार संबंधित नौकेचा पाठलाग करून तिला ताब्यात घेत जप्त करण्यात आले. नौका सुरक्षितपणे देवगड बंदरात आणल्यानंतर रात्री उशिरापर्यंत तिच्यावरील कायदेशीर कार्यवाही सुरू होती. या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.
जप्त नौकेची माहिती
जप्त करण्यात आलेल्या नौकेचे नाव ‘सुलतान (Sulthan)’ असून तिचा नोंदणी क्रमांक IND-KA-02-MM-6335 असा आहे. श्रीमती गुलफाम अब्दुल मुनाफ या नौकेच्या मालक असून त्या पुत्तूर, जिल्हा उडुपी, कर्नाटक येथील रहिवासी आहेत. या नौकेचा परवाना केवळ विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (EEZ) वैध असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत मासेमारी करण्याचा अधिकार नसतानाही नौका येथे मासेमारी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मलप्पे बंदरातील नौकांकडून महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून मासेमारी केली जात असल्याने स्थानिक मच्छिमारांचे मोठे नुकसान होत असल्याच्या तक्रारी मालवण आणि देवगड परिसरातील मच्छिमारांनी मत्स्यव्यवसाय विभागाकडे केल्या होत्या. विशेषतः या नौकांकडून स्थानिक मच्छिमारांची जाळी वारंवार तोडली जात असल्याची तक्रार होती. या तक्रारींची दखल घेत विभागाचे अधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात बेकायदा मासेमारी करणाऱ्या मलप्पे बंदरातील नौकांवर लक्ष ठेवून होते.
गेल्या पाच दिवसांत दोन वेळा महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत मासेमारी करणाऱ्या मलप्पे येथील नौका पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, संबंधित मासेमारी नौका विभागाच्या गस्ती नौकेपेक्षा अधिक क्षमतेच्या आणि वेगवान असल्याने दोन्ही वेळा त्या थोडक्यात निसटण्यात यशस्वी झाल्या होत्या. तरीही विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठलाग आणि शोधमोहीम थांबवली नाही. सातत्याने मागोवा घेत अखेर तिसऱ्या प्रयत्नात ‘सुलतान’ नौका पकडण्यात यश मिळाले. त्यामुळे परप्रांतीय नौकांच्या घुसखोरीविरोधातील विभागाच्या मोहिमेला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.
मंत्री नितेश राणे यांचे कारवाईवर बारकाईने लक्ष
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत होणारी परप्रांतीय नौकांची घुसखोरी आणि बेकायदा मासेमारी याविरोधात मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सुरुवातीपासूनच कठोर भूमिका घेतली आहे. स्थानिक मच्छिमारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी अशा नौकांविरोधात कठोर कारवाई करण्याची भूमिका त्यांनी घेतली असून विभागाच्या कामकाजावरही ते सातत्याने लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे मत्स्यव्यवसाय विभागाच्या कारवाईला अधिक बळ मिळत असून स्थानिक मच्छिमारांच्या तक्रारींची दखल घेऊन प्रत्यक्ष समुद्रात धडक कारवाया केल्या जात आहेत. ‘सुलतान’ नौकेवरील कारवाईमुळे स्थानिक मच्छिमारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही कारवाई मालवणचे अंमलबजावणी अधिकारी प्रतीक महाडवाला आणि देवगडचे अंमलबजावणी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. विभागाच्या ‘शीतल’ या गस्ती नौकेच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व रक्षक दीपेश मायबा, दिवाकर, संतोष टुकरुल, धाकोजी खवले, अल्पेश नेसवनकर आणि स्वप्नील सावजी यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई पार पडली.

रात्रीच्या अंधारात भर समुद्रात अधिक क्षमतेच्या आणि वेगवान नौकेचा पाठलाग करून तिला पकडणे हे मोठे आव्हान होते. यापूर्वी दोन वेळा प्रयत्न करूनही नौका हातातून निसटली होती. मात्र, अपयशाने खचून न जाता अधिकाऱ्यांनी तिसऱ्या प्रयत्नात यश मिळविले. त्यांची चिकाटी, धाडस आणि कर्तव्यनिष्ठा निश्चितच कौतुकास्पद आहे. परप्रांतीय नौकेवर करण्यात आलेली ही दुसरी मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईतून मत्स्यव्यवसाय विभागाची बेकायदा मासेमारीविरोधातील मोहीम सातत्याने आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे.
या कारवायांमुळे स्थानिक मच्छिमारांचे आर्थिक हित सुरक्षित राखण्यास मदत होत असून सागरी जैवविविधतेच्या संरक्षणालाही हातभार लागत आहे. भविष्यात विभागाला नवीन आणि अधिक क्षमतेच्या गस्ती नौका उपलब्ध झाल्यास अशा कारवाया अधिक वेगाने आणि प्रभावीपणे करता येतील. त्यामुळे स्थानिक मच्छिमारांना आपल्या पारंपरिक सागरी हद्दीत अधिक निर्धास्तपणे मासेमारी करता येईल, असा विश्वास विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत होणाऱ्या बेकायदा मासेमारीविरोधात यापुढेही ‘शून्य सहनशीलता’ धोरण कायम ठेवण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

You cannot copy content of this page