Headlines

CPR प्रशिक्षणातून मिळणार जीव वाचविण्याचे धडे…

कुडाळात ४ नोव्हेंबरला विशेष शिबिराचे आयोजन:अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा स्वयंसेविकांना मिळणार प्रात्यक्षिक प्रशिक्षण..

⚡कुडाळ ता.०३-: हृदयविकारामुळे अचानक उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी CPR (कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन) या प्रथमोपचार पद्धतीचे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने रोटरी क्लब ऑफ कुडाळ, राणे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, USV Pharma Ltd. आणि पंचायत समिती कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा स्वयंसेविकांसाठी विशेष CPR जनजागृती व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार, ४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता कुडाळ येथील हॉटेल गुलमोहरमधील महालक्ष्मी हॉल येथे हे शिबिर होणार आहे.
ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा दुवा म्हणून अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा स्वयंसेविका कार्यरत असतात. त्या सातत्याने विविध कुटुंबांच्या संपर्कात असल्याने त्यांना CPR प्रशिक्षण मिळाल्यास आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत करणे शक्य होणार आहे.
या प्रशिक्षणामध्ये CPR देण्याची योग्य पद्धत, Hands-only CPR चे प्रात्यक्षिक, AED (ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर) यंत्राचा वापर तसेच अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत कसे वागावे, याबाबत मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे.
रुग्णालय किंवा रुग्णवाहिका पोहोचेपर्यंतचा वेळ अनेकदा निर्णायक ठरतो. अशा वेळी प्रशिक्षित व्यक्तीने तातडीने दिलेली मदत जीव वाचविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. त्यामुळे CPR प्रशिक्षण ही केवळ आरोग्यविषयक माहिती नसून सामाजिक जबाबदारीही आहे.
या पार्श्वभूमीवर कुडाळ तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा स्वयंसेविकांनी या प्रशिक्षण शिबिरात आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
‘CPR शिका – जीवन वाचवा’ हा संदेश या उपक्रमातून समाजापर्यंत पोहोचविण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.

You cannot copy content of this page