Headlines

जयंत पाटील यांचा ४ व ५ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग दौरा…

पिंगुळी पाझर तलावाची पाहणी:उपोषणकर्त्यांची घेणार भेट..

⚡कुडाळ ता.०३-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा विधानमंडळ पक्षनेते आमदार जयंतराव पाटील बुधवार आणि गुरुवार, दि. ४ व ५ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते पिंगुळी येथील जिल्हा परिषद पाझर तलावाची पाहणी करणार असून, तलावाच्या संरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांची भेट घेणार आहेत. तसेच कुडाळ येथे पत्रकार परिषद घेणार आहेत.
बुधवार, ४ नोव्हेंबर रोजी जयंत पाटील मोटारीने ईश्वरपूर येथून आंबोलीकडे प्रयाण करणार असून, सुमारे १६० किलोमीटरचा प्रवास करून आंबोली येथे मुक्काम करणार आहेत.
गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता आंबोली येथून पिंगुळीकडे प्रयाण करतील. सकाळी ८.३० वाजता पिंगुळी येथे दाखल झाल्यानंतर जिल्हा परिषद पाझर तलावाची पाहणी करतील. त्यानंतर सकाळी १० वाजता कुडाळ प्रांत कार्यालयाकडे प्रयाण करून पाझर तलावाच्या प्रश्नासाठी उपोषण करणारे जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांची भेट घेणार आहेत.
सकाळी ११.३० वाजता कुडाळ येथे त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी भोजनानंतर ते कुडाळहून सावंतवाडी तालुक्यातील सासोलीकडे रवाना होतील. दुपारी २ वाजता सासोली येथे पोहोचल्यानंतर तेथील साईटची पाहणी करणार आहेत.
त्यानंतर दुपारी ३.३० वाजता मोटारीने गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा येथे प्रयाण करतील. सायंकाळी ५.२० वाजता एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाने मुंबईकडे रवाना होतील. सायंकाळी ६.४० वाजता मुंबई विमानतळावर आगमन झाल्यानंतर पुढील प्रवास करून मुक्काम करतील.
जयंत पाटील यांच्या या दौऱ्यात पिंगुळी पाझर तलावाचा प्रश्न आणि सासोली येथील साईटची पाहणी याकडे विशेष लक्ष लागले आहे.

You cannot copy content of this page