कांदळगाव मसुरे रस्त्याची दुरावस्था ..!

१ कोटी ९६ लाख रुपये खर्चाची निविदा निधी अभावी रखडली;आमदार, खासदारांकडुन आश्वासनांची खैरात.

*💫मालवण दि२२-:* वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा असा ओळखला जाणारा मालवण तालुक्यातील ओझर -कांदळगाव-मसुरे- बांदिवडे ते आडवली रस्ता पुर्णत: खड्यात गेल्याने वाहतुकीस धोकादायक बनला आहे. वाहने नादुरुस्त होण्या बरोबरच अनेक छोटे मोठे अपघात वाहन घसरुन तसेच अरुंद रस्त्यामुळे नियमीत होत आहेत. सत्ताधारी आमदार व खासदारांकडुन गेली दोन वर्षे केवळ आश्वासनेच मिळत असल्याने ग्रामस्थ तसेच वाहन चालक सुद्धा संतप्त बनले आहेत. आता तरी शासनाने कांदळगाव, तळाणीवाडी, चांदेर, मसुरे वासीयांच्या संतापाचा अंत पाहु नये असा इशारा माजी सभापती उदय परब यानी दिला आहे. ग्रामस्थां मधुनच आता जन आंदोलन उभारले जाणार असुन त्यापुर्वी या रस्त्याच्या कामास प्रारंभ व्हावा अशी आग्रही मागणी होत आहे. कांदळगाव येथील श्री रामेश्वर देवालयाला ऐतिहासीक व अध्यात्मीक महत्व आहे. तसेच कोकणातील प्रसिद्ध असे आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी मंदिर, मसुरे ग्रामदैवत श्री देव भरतेश्वर, भरतगड किल्ला, बांदिवडे पावणाई मंदिर, भगवंतगड किल्ला व इतर प्रसिद्ध पर्यटन स्थळे व प्रसिद्ध देवालये याच मार्गावर आहेत. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटक सुद्धा मोठ्या प्रमाणात या मार्गाचा वापर करतात. मागील पाच वर्षे या रस्त्यासाठी शासनाचा निधीच खर्च झालेला नसुन रस्त्याचा डांबरी पृष्ठभाग पुर्णपणे उखडुन गेला आहे. या रस्त्याच्या कामाबाबत कांदळगाव सरपंच सौ. उमदी उदय परब यानी पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांचे सुद्धा निवेदनाद्वारे लक्ष वेधले असुन केवळ आश्वासन मिळण्या पलीकडे कोणतीही कृती होत नाही आहे गतवर्षी झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती विषयक निविदा कार्यवाही प्रगतीत होती. तथापी वित्त विभागाच्या ४ मे २०२० च्या शासन निर्णयाने अर्थसंकल्पात मंजुर असलेल्या रस्त्यांची निविदा विषयक प्रक्रिया संस्थिगीत झाली आहे. खरंतर २०१९ मधील पावसाळ्यात दुरावस्था झालेल्या या रस्त्याची गतवर्षी म्हणजे २०२० च्या पावसाळ्यात आणखी अवस्था बिकट बनली आहे. दरम्यान सातत्याने पाठपुरावा होणाऱ्या या रस्त्याची अर्थसंकल्पात मंजुर नमुद कामाची निविदा प्रक्रिया तातडीने पुर्ण करुन कार्यारंभ आदेश देण्यास शासनाची मंजुरी प्राप्त होणेसाठी प्रस्ताव सार्वजनीक बांधकाम मंडळ रत्नागीरी कार्यालयाकडुन देण्यात आला आहे. सदर रस्ता पुर्णपणे खड्यात हरवला असुन आता यावर तातडीने कार्यवाही होण्यासाठी येथील सत्ताधारी लोकप्रतिनिधीनी प्रयत्न करणे तितकेच महत्वाचे आहे. दरम्यान सदर प्रमुख जिल्हा मार्ग क्र ५२ या रस्त्याला अर्थ संकल्पात मंजुरी मिळाली असुन १ कोटी ९६ लाख रुपये खर्चाचे अती तातडीचे काम प्राधान्याने करावे म्हणुन सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनास मार्गदर्शन केले आहे. सदर कामाची निविदा प्रक्रिया रखडली असुन त्यानंतरच कार्यारंभ आदेश मिळणार असल्याने आणखी किती दिवस ग्रामस्थानी हा धोकादायक प्रवास करायचा असा प्रश्न सर्वसामान्य ग्रामस्थ विचारत आहेत. कोविड काळात शासनाने सर्वच कामाना स्थगिती दिली असुन निदान अशा प्रकारच्या अत्यावश्यक कामांसाठी शासनाने तातडीने निधि उपलब्ध करुन देणे अत्यावश्यक बनले आहे. या रस्त्यावर मोठा अपघात होऊन जीवित हानी झाल्यानंतर शासनाला जग येणार आहे का? असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे.

You cannot copy content of this page