किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजन
⚡कणकवली ता.२६-: पत्र संग्राहक म्हणून महाराष्ट्रात ख्याती मिळविणाऱ्या तळेरे येथील निकेत पावसकर यांच्या पत्रसंग्रह प्रारंभाला यावर्षी पंधरा वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने शनिवार ६ ऑगस्ट रोजी सायं. ४ वा. तळेरे अक्षरघर येथे श्री पावसकर यांचा गौरव आणि त्यांची मुलाखत असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. किशोर मोरजकर चारिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांच्या हस्ते पावसकर यांचा गौरव करण्यात येणार असून साहित्य- समाज चळवळीतील कार्यकर्ते ऍड विलास परब यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या या कार्यक्रमात कवी राजेश कदम हे पावसकर यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.
निकेत पावसकर हे गुणी कलावंत रसिक.ते गेली 15 वर्षे विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचा संग्रह करीत आहेत. यामध्ये देश विदेशातील 1700 व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचा समावेश आहे. या संग्रहाची प्रदर्शने मुंबई, कोल्हापुर, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह बेळगाव येथे झालेली आहेत. यावर्षी या संग्रहाला 15 वर्षे पूर्ण होत असून यानिमित्ताने त्यांच्याशी या वाटचालीचा प्रवास जाणुन घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, यावेळी त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र त्याचबरोबर देशातील साहित्य, कला, क्रीडा, संगीत अशा विविध क्षेत्रातील विख्यात व्यक्तींचे हस्ताक्षर श्री पावस्कर यांच्या अक्षर घरात संग्रहाला आहे.एवढेच नाही तर विदेशातील विख्यात संशोधकांपासून जगभर ख्याती मिळवलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचे हस्ताक्षरही त्यांनी अपार कष्टाने मिळवून आपल्या संग्रही ठेवले आहे. या आपल्या कामातून तरळे गावाला सांस्कृतिक चेहरा मिळवून देणाऱ्या पावसकर यांचा सदर गौरव किशोर मोरजकर ट्रस्ट कडून करण्याचा निर्णय घेण्यात आला. मोरजकर ट्रस्टतर्फे विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून हा नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मोरजकर ट्रस्टचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांनी केले आहे.
