⚡मालवण ता.२५-: बुद्धिबळ हा जागतिक स्तरावर खेळला जाणारा खेळ असून भारत देश त्यात अग्रणी आहे. या खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, स्मरणशक्ती, संशोधन वृत्ती आणि बौद्धिक प्रगल्भता वाढीस लागते. ज्याचा फायदा त्यांना रोजच्या जीवनात आणि अभ्यासात होतो, असे प्रतिपादन बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर यांनी केले.
बॅ. नाथ पै सेवांगण, मालतण आणि मुक्ताई अकॅडेमी, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने “मोफत बुद्धिबळ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन सेवांगण येथे करण्यात आले होते. या प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वय वर्षे ०६ ते १७ या वयोगटातील ५६ मुलांनी सहभाग घेऊन या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. या प्रशिक्षणासाठी मुक्ताई अकॅडेमीचे अध्यक्ष आणि तज्ञ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर आणि त्यांचा मुलगा कु. बालकृष्ण पेडणेकर तसेच मालवणचे सुप्रसिद्ध बुद्धिबळपटू श्री. संतोष गांगनाईक यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळकर, श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर, ऍड. संदिप निंबाळकर, ऍड. दिलीप ठाकूर, श्री. रुजारिओ पिंटो आदि मान्यवर उपस्थित होते. शिबीराचे संपुर्ण व्यवस्थापन सेवांगण कर्मचारी वर्गाने केले.
दि. ३० जुलै पासून महिन्याच्या प्रत्येक शनिवार आणि रविवार सायंकाळी ५ ते ७ यावेळेत नियमित “बुद्धिबळ प्रशिक्षण वर्ग” बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण आणि मुक्ताई अकॅडेमी, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात येणार असल्याचे यावेळी संस्थेचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर यांनी जाहीर केले.
