⚡कणकवली ता.२४-: कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून अनेक विकासाभिमुख कामे केली जात असताना शहरातील जनतेला महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार कंपनीच्या चुकांमुळे त्रास सहन करावा लागत असल्यामुळे अनेकदा ठेकेदार कंपनीचे लक्ष वेधले होते. मात्र ठेकेदार कंपनीने केवळ या समस्यांकडे दुर्लक्ष करण्याचे काम केले. गेली तीन वर्षे सातत्याने कणकवली शहरामध्ये मोठ्या पावसाच्या वेळी सारस्वत बँक, डॉ.आबू तायशेटे हॉस्पिटल आदी भागांमध्ये पाणी शिरत मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. याबाबत अनेकदा नगरपंचायत मध्ये बैठक देखील घेण्यात आल्या.
कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी गेले तीन वर्षे सातत्याने निर्माण होणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी मार्ग काढण्याचा निर्णय घेतला. व त्याची प्रत्यक्षात कार्यवाही देखील केली. यामुळे गेल्या तीन वर्षांची निर्माण झालेली समस्या यावर्षी तूर्तास तरी उद्भवली नाही. त्यामुळे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे पाहायला मिळत आहे. यावर्षी जुलै महिना संपत आला तरी आतापर्यंत झालेल्या पावसाने एकदाही कणकवली सारस्वत बँक च्या मागील भाग, तायशेटे हॉस्पिटल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कडील सबस्टेशन जवळील भाग या सर्वच भागांमध्ये पाणी साचले नसल्याने नगराध्यक्षांनी केलेल्या उपाययोजनांना यश आल्याचे पाहायला मिळत आहे. या भागांमध्ये मोठ्या पावसाच्या दरम्यान पाणी साचून जनतेला त्रास होत होता. याबाबत सातत्याने जनतेमधूनही ही कामे करण्याची मागणी होत होती. प्रामुख्याने हॉटेल गोकुळधामकडे ठेकेदार कंपनीकडून करण्यात आलेल्या चुकीच्या पद्धतीच्या कामा मुळे येथे पाणी साचत होते. मूळ नाला जमिनी खाली राहत होता. तर त्या वरती नवीन नाल्याचा भाग आणून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने मोठ्या पावसाचा वेळी सारस्वत बँक व त्यामागील कॉम्प्लेक्स परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत होते. मोठ्या पावसाच्या वेळी येथील कॉम्प्लेक्स मधील नागरिकांना वाहने महामार्गावर सर्विस रस्त्यावर आणून पार्किंग करावी लागत होती. मात्र गतवर्षी नगरपंचायत च्या माध्यमातून गोकुळधाम हॉटेल कडे हायवे ठेकेदार कंपनीने केलेला बॉक्सेल नाला व मूळ नाला हा एकत्र करत या नाल्याचे रुंदीकरण करत नव्याने काम करण्यात आले. यामुळे पाणी साचून दरवर्षी पावसाळ्यात उडणारा गोंधळ यावर्षी बंद झाल्याचे पहायला मिळाले. तर अशीच काहिशी स्थिती तायशेटे हॉस्पिटल जवळील भागात सातत्याने होत होती. तायशेटे हॉस्पिटल पासून ते सह्याद्री हॉटेलच्या मागील भागात पाणी भरत असल्याने या ठिकाणी असलेल्या कार्यालय, दुकाने यांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र ही समस्या देखील यावर्षी उद्भवली नाही. तर सार्वजनिक बांधकाम कार्यालया कडील सबस्टेशन जवळील काही भागात गेली दोन वर्षे पाणी साचण्याच्या प्रकाराने त्या भागातील नागरिक व तेथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील त्रास सहन करावा लागत होता. मात्र यातील कोणतीच कामे महामार्ग ठेकेदार कंपनीने करून देण्यास सहमती दर्शवली नव्हती. मात्र नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी गतवर्षी सबस्टेशन कडील हे काम आपल्या स्टाईलने इशारा देत मार्गी लावून घेतले. उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी स्वतः या ठिकाणी उभे राहून सबस्टेशन च्या गडग्यापासून ते सार्वजनिक बांधकाम कार्यालयापर्यंत चे पाणी निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी मार्ग काढण्याच्या दृष्टीने गटाराचे बांधकाम करून घेतले. व यावर्षी हा प्रश्न देखील मार्गी लागला. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी यांच्या चुकांचे खापर नगरपंचायत वर सातत्याने फुटत असताना नगरपंचायत च्या माध्यमातून नगराध्यक्ष समीर नलावडे व नगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी ही पावसाळ्यात समस्या निर्माण होत असलेली कामे मार्गे लावली. शहरवासीयांना ठेकेदार कंपनीकडून होणाऱ्या गेल्या तीन वर्षांच्या पावसाळ्यातील त्रासांपासून सुटका देखील करून दिली आहे. याबद्दल नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह नगरपंचायत च्या कामाचे समाधान देखील व्यक्त केले जात आहे.
