⚡मालवण ता.२३-: मालवण शहरातील तालुका स्कुल समोरील मुख्य रस्त्यावरील वीज पोलावर मोठ्या प्रमाणात वेलीची झाडी वाढली असून यामुळे या वीज पोलावरील स्ट्रीट लाईट चा पुरेसा प्रकाश रस्त्यावर पडत नसल्याचे चित्र आहे. अशाचप्रकारे मालवण शहरातील अनेक वीज पोलांवर झाडी वाढली असून यामुळे स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात अडथळा येत आहे. त्यामुळे या पोलावरील वेलीची झाडी काढण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
मालवण शहरातील तालुका स्कुल समोरील मुख्य रस्त्यावर वीज पोल असून त्यावर स्ट्रीट लाईट देखील आहे. मात्र हा वीज पोल व त्यावरील वीज वाहिन्या पूर्णपणे वेलींच्या झाडीने वेढल्या गेल्या आहेत. या पोलाच्या ठिकाणी तीन रस्ते येऊन मिळत असल्याने याठिकाणी स्ट्रीट लाईट चा चांगला प्रकाश आवश्यक असून या वेलींमुळे स्ट्रीट लाईटचा प्रकाश व्यवस्थित रित्या पडत नसल्याचे दिसून येते.
मालवणात अशाच प्रकारे अनेक वीज पोल व स्ट्रीट लाईट पोलांवर वेली वाढलेल्या दिसून येतात. सध्या पावसाळ्यात या वेली अधिकच वाढलेल्या आहेत. त्यामुळे स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात अडथळा येण्याबरोबरच या वेलींमुळे अनेकदा शॉर्ट सर्किट होऊन वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकारही होत आहेत. तसेच वीज कर्मचाऱ्यांना या वेलींमुळे वीज पोल दुरुस्ती करतानाही अडथळे येतात. त्यामुळे अशा सर्वच वीज पोलांवरील वाढलेल्या वेली व झाडी काढण्यात याव्यात, याबाबत वीज वितरण विभागाने लक्ष द्यावेअशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
