⚡बांदा ता.०८-: ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा पंचक्रोशी यांच्या वतीने (कै.) तुळशीदास यशवंत धामापूरकर स्मृती विद्यार्थी निबंध स्पर्धा २०२५ चे आयोजन २० डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता पीएमश्री केंद्र शाळा बांदा क्रमांक १ येथे करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, लिखाणकौशल्य आणि सामाजिक भान वाढविण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा पार पडणार असून बांदा पंचक्रोशीतील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना सहभागासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी स्व. तुळशीदास धामापूरकर कुटुंबिय, बांदा यांनी प्रायोजकत्व दिले आहे. एका शाळेतून जास्तीत जास्त तीन स्पर्धक सहभागी होऊ शकतात. निबंध लेखनासाठी लागणारा कागद आयोजकांकडून पुरविला जाईल. दिलेल्या कागदाच्या एका बाजूवरच निबंध लिहिण्यास परवानगी असेल. एक तास हा निबंध लेखनासाठी निश्चित वेळ असेल.
८ वी ते १० वी गटासाठी (४००–५०० शब्द) ‘व्यसन – एक समस्या’, ‘माझा आवडता लेखक’, ‘कचरा व्यवस्थापन – काळाची गरज’ हे विषय ठेवण्यात आले असून प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे 500, 400, 300 रुपये रोख व सन्मानचिन्ह तसेच दोन उत्तेजनार्थ क्रमांकांना प्रत्येकी रोख 200 रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.
५ वी ते ७ वी गटासाठी (२००–२५० शब्द) ‘माझा गाव – आदर्श गाव’, ‘माझे शिक्षक – माझे मार्गदर्शक’, ‘झाडे वाचवा – पर्यावरण वाचवा’ हे विषय ठेवण्यात आले असून प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे 400, 300, 200 रुपये रोख व सन्मानचिन्ह तसेच दोन उत्तेजनार्थ क्रमांकांना प्रत्येकी रोख 200 रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी गुरुनाथ नार्वेकर (8855079336 / 9422379346 किंवा प्रमिला नाईक, नट वाचनालय बांदा (7796831256) संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा विद्यार्थ्यांना लेखनकलेची गोडी लागावी, सामाजिक प्रश्नांविषयी चिंतन वाढावे आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळावी यासाठी एक मौल्यवान व्यासपीठ ठरणार आहे. बांदा पंचक्रोशीतील सर्व शाळांनी उत्साहाने सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
बांदा येथे तुळशीदास धामापूरकर स्मृती विद्यार्थी निबंध स्पर्धा जाहीर…
