⚡मालवण ता.०८-:
समुद्रातील वाढत चाललेले प्रदूषण कमी करण्यासाठी आणि सागरी जैवविविधतेचे संवर्धन करण्याच्या हेतूने ‘समुद्र कचरा स्वच्छता उपक्रम : टप्पा – २’ हा विशेष उपक्रम मंगळवार दि.९ डिसेंबर रोजी मालवण बंदर जेटी येथे आयोजित केला आहे. ‘महासागरांसाठी एकत्र येऊया’ या संदेशासह सकाळी ८ ते ९ या वेळेत होणारा हा उपक्रम वनशक्ती, स्वच्छ भारत, सागर शक्ती – ओशन्स पीपल, महाराष्ट्र मत्स्य विभाग, किल्ला संरक्षण गट, युथ बीट्स फॉर क्लायमेट, निलक्रांती, वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडणार आहे.
या उपक्रमामध्ये प्रशिक्षित डायव्हर्स समुद्रात उतरून प्लास्टिक, बाटल्या, मासेमारीच्या जाळ्या, धातूचे अवशेष यांसारखा समुद्रतळावर जमा झालेला कचरा बाहेर काढणार आहेत. तसेच स्वयंसेवकांमार्फत किनारपट्टी स्वच्छता मोहिमही राबवण्यात येणार आहे. सागरी जीवसृष्टीचे रक्षण आणि प्रदूषणमुक्त किनारे निर्माण करण्याच्या उद्देशाने नागरिक, विद्यार्थी, पर्यावरण प्रेमी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
