वेंगुर्ला ता.०८-:
वेंगुर्ला तालुक्यातील
रायसाहेब डॉ. रा. धों. खानोलकर हायस्कूल मठ ही शाळा शासन निर्णयानुसार शून्य शिक्षकी जाहीर झाल्याने विद्यार्थी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान शाळा वाचविण्यासाठी डॉ. रा. धों. खानोलकर हायस्कुल मठ कृती समिती, पालक, ग्रामस्थ यांच्या वतीने येथील सभागृहात आज सोमवारी (8 डिसेंबर) सायंकाळी मुख्य सल्लागार रवींद्र खानोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सभा संपन्न झाली. यावेळी आजच्या सभेत मंगळवारी सकाळी 10.30 वाजता ते सायंकाळी 4.45 वाजता या कालावधीत शाळा बंद आंदोलन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.मठ हायस्कुल कृती समिती अध्यक्ष दिगंबर परब यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा संपन्न झाली. यावेळी मठ ग्रामपंचायत सरपंचा रुपाली नाईक, उपसरपंच सोनिया मठकर, कमिटी उपाध्यक्ष केशव ठाकूर, सचिव संतोष तेंडोलकर, सदस्य तुषार आईर, न्हानू गावडे, शैलेश राणे, कृष्णा मठकर, प्रीती परब, मयुरी ठाकूर, सुनिखी धुरी, माजी उपसरपंच निलेश नाईक, ग्रा. पं. सदस्य शमिका मठकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीलिमा गावडे, संजना तेंडोलकर, मठ पोलीसपाटील अदिती परुळेकर, सतये पोलीसपाटील शमिका धुरी, माजी सरपंच किशोर पोतदार, सामाजिक कार्यकर्ते अजित नाईक, संतोष परब, वामन गावडे, शिवराम आरोलकर, सुरेश बोवलेकर, मिलिंद खानोलकर, महेश धुरी, दिवाकर गावडे, सुहास तेंडोलकर, पत्रकार अजय गडेकर आदिसह पालक, माजी विद्यार्थी उपस्थित होते.शासनाच्या वतीने शून्य शिक्षकी शाळा व शिक्षक समायोजन धोरण निर्गमित करण्यात आले आहे. दरम्यान वेंगुर्ला तालुक्यातील मठ गावातील ग्रामीण भागातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मठ हायस्कूल हे पंचकोशीतील शिक्षणाचे केंद्र आहे. शासनाने शून्य शिक्षकी शाळा नियमाचे अवलंब केल्यास हायस्कूलमधील मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. गावातील सर्वसामान्य पालक गरिबीतून मुलांना शिक्षण देत आहेत. समायोजन प्रक्रिया झाल्यास हायस्कूलमधील असणाऱ्या मुलांच्या संख्येच्या निम्मी मुले गरिबीमुळे तशीच घरी बसणार आहेत. चालू शैक्षणिक वर्षात तरी या समायोजनाचा घाट मागे घेऊन हायस्कूल सुरू ठेवण्यात यावे, याबाबतचे निवेदन शिक्षणाधिकारी ( माध्यमिक) श्री. शिंपी व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खेबूडकर यांच्याकडे कृती समितीच्या वतीने आज देण्यात आले आहे.
याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या मंगळवार दिनांक 9 डिसेंबर रोजी शालेय वेळेत शाळेबाहेर सर्व विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षणप्रेमी यांच्या माध्यमातून शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे. हायस्कूल बचाव आंदोलनास उपस्थित राहून सहकार्य करावे,
असे आवाहन डॉ.रा.धो.खानोलकर हायस्कुल कृती समीती गठ व ग्रामस्थ, पालक यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
मठ हायस्कूल कृती समिती मार्फत शासन धोरणाविरोधात उद्या शाळा बंद आंदोलन…
