मालवण पत्रकार समिती तर्फे आचरा येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

⚡मालवण ता.२२-: शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत योग्य मार्गदर्शन व्हावे, त्यांच्या मध्ये प्रशासकीय सेवेची आवड निर्माण व्हावी यासाठी मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने तालुक्यामधील विविध शाळा, हायस्कूल, महाविद्यालयांमध्ये ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या पत्रकार समिती तर्फे राबविण्यात येणाऱ्या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आचरा येथील न्यू इंग्लिश स्कुल येथून मंगळवार २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती मालवण तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष संतोष गावडे यांनी दिली आहे.

मालवण तालुका पत्रकार समिती आणि धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कूल आचरा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आचरा हायस्कूल येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रमाचे पहिले पुष्प गुंफण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे हे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तर मालवण तहसीलदार अजय पाटणे हेही विद्यार्थ्यांशी यूपीएससी, एमपीएससी बाबत हितगुज साधणार आहेत.

केंद्र सरकार व राज्य सरकार त्यांच्या विविध विभाग तसेच मंत्रालयातर्फे विविध पदांची भरती प्रत्येक वर्षी होत असते. यातील अनेक स्पर्धा परीक्षाबाबत विद्यार्थ्यांना माहिती नसते. स्पर्धा परीक्षांची माहिती, परीक्षा पद्धत, अभ्यासक्रम याची माहिती विद्यार्थ्यांना विद्यार्थीदशेपासून व्हावी, हा उद्देश ठेवून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दोन महिन्यातून एकदा हा उपक्रम तालुक्यात विविध ठिकाणी घेण्यात येणार आहे, असेही अध्यक्ष गावडे यांनी सांगितले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य महेश सरनाईक, मालवण पत्रकार समितीचे उपाध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, खजिनदार सिद्धेश आचरेकर, नितीन गावडे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page