⚡मालवण ता.२२-: भारताच्या राष्ट्रपती पदी द्रौपदी मुर्मु यांची निवड झाल्याने कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या प्रशालेतील कलाशिक्षक श्री. समीर चांदरकर व प्रशालेतील विद्यार्थिनी श्रेया चांदरकर, रिया भगत, ममता अंगचेकर या विद्यार्थ्यांनी मिळून नवनिर्वाचित राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुरमु यांची आकर्षक रांगोळी साकारत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
वराडकर हायस्कुलचे कलाशिक्षक समीर चांदरकर हे एक उत्तम चित्रकार, रांगोळीकार, शिल्पकार आहेत. यापूर्वी त्यांनी महिला दिनानिमित्त दोन पेन्सिलच्या साहाय्याने एकाच वेळी लता मंगेशकर यांची दोन रेखाचित्र काढली होती. तर पिंपळाच्या पानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा कोरली होती. तर अलीकडेच आषाढी एकादशी निमित्त विजेच्या बल्ब मध्ये विठ्ठलाची मूर्ती साकारली होती. या कलाविष्कारांबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक झाले होते. आता चांदरकर यांनी विद्यार्थिनींच्या मदतीने नूतन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची प्रतिमा रांगोळीतून साकारून पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले आहे. यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री संजय नाईक यांनी मार्गदर्शन केले तसेच कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. अजयराज वराडकर व सर्व संचालक मंडळ यांनी शुभेच्छा दिल्या.
