बांदा येथे राष्ट्रवादीच्या कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांचे आश्वासन
बांदा/प्रतिनिधी
विद्यार्थीदशेत भरपूर अभ्यास करा. भविष्यातील आपले ध्येय निश्चित करुन त्यानुसार मेहनत घ्या. मोठे अधिकारी, व्यवसायिक होण्याची स्वप्ने पाहून त्यानुसार शैक्षणिक वाटचाल ठेवा. त्यासाठी अर्चना फाऊंडेशन सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन अर्चना फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांनी बांदा येथे केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा केंद्रशाळेत सौ. अर्चना परब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात सौ. परब बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, महिला जिल्हाध्यक्ष सौ. रेवती राणे, रत्नागिरी पक्ष निरीक्षक सौ. दर्शना बाबर देसाई, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, प्रशांत गवस, समीर परब आदी मान्यवर उपस्थित होते.
सौ. अर्चना परब म्हणाल्या, यशस्वी होण्यासाठी परिश्रमाला पर्याय नाही. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ते काम करीत असतात. प्रत्येक क्षेत्रातील त्यांचा अभ्यास व अनुभव दांडगा आहे. सातत्यपूर्ण अभ्यासातून भविष्यात यशस्वी व्हा व आपल्या शाळा व आईवडिलांचे नाव मोठे करा असे आवाहन केले.
. पुंडलिक दळवी म्हणाले कि, शिक्षण घेतानाच तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. शिक्षण आणि कठोर मेहनत ही तुम्हाला भविष्यात वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारी आहे. त्यामुळे कितीही संकटे आली तरी न डगमगता ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा. यावेळी रेवती राणे यांनीही मार्गदर्शन केले. विद्यार्थी ओंकार याच्या हस्ते केक कापून अजितदादांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कनिष्का केणी हिची नवोदय विद्यालयात निवड झाल्याबद्दल तिचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक जे. डी. पाटील तर आभार मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर यांनी मानले.
