दोन मृत्युमुखी एक गंभीर जखमी;मळई परिसरात भीतीचे वातावरण
⚡देवगड ता.२१-: तालुक्यातील मळई (जामसंडे)येथील शेतकरी सुरेश उमाजी धुरी यांच्या घरा नजीकच्या गोठ्यात दाव्याने बांधलेल्या वासराला ओढून बिबट्याने फडशा पाडल्याची घटना मळई येथे बुधवारी व गुरुवारी मध्यरात्री दोन वाजल्यानंतर घडली असावी या हल्ल्यात पहिल्या रात्री एक वासरू,व दुसऱ्या रात्री एक वासरु मृत्युमुखी पडली. तर एका वासराच्या नरडीला चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले आहे.एकूण गोठ्यातील तीन वासरांवर हल्ला करण्यात येऊन त्यात दोन मृत्युमुखी व एक एक गंभीर जखमी झाले आहे.
हा बिबट्या मादी जातीचा असण्याची शक्यता वनविभाग अधिकारी यांचेकडून व्यक्त करण्यात येत असून तिच्या समवेत तिची पिल्ले असावीत असा अंदाज नजीकच्या आढळलेल्या पंजाच्या ठशावरून वर्तविण्यात येत आहे. बिबट्याचा मुक्त संचाराने मळईमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वनविभागाचे देवगड वनक्षेत्रपाल सादिक फकीर,मिठबाव वनरक्षक निलेश साठे,यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा रीतसर पंचनामा केला.व वरिष्ठ अधिकारी यांचेशी चर्चा करून या पुढील योग्य ती कार्यवाही वनविभाग मार्फत करण्यात येणार आहे.
या घटनेचे वृत्त समजताच देवगड नगराध्यक्षा साक्षी प्रभू पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे,पोलीस हवालदार राजन जाधव,नगरसेवक रोहन खेडेकर,निवृत्ती (बुवा )तारी, नितीन बांदेकर,तेजस मामघाडी,माजी नगरसेवक विकास कोयंडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे,माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर,मिलिंद माने ,यांनी भेट देऊन पाहणी केली.
